महाराष्ट्राच्या राजकारणतील दिग्गज नेते शरद पवार यांनी आज एक मोठं विधान केलं. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या विषयी विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. आता एका माजी काँग्रेस नेत्याने या बद्दल मोठा दावा केला आहे. “शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत होते. शरद पवार यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती. ती काँग्रेसने फेटाळून लावली” असं दावा संजय निरुपम यांनी केला. संजय निरुपम मागची अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. मुंबईत लोकसभेच्या जागावाटपावरुन त्यांचं पक्षासोबत बिनसलं. त्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.
“बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीकडे असलेली राजकीय कुशाग्र बुद्धिमत्ता अपुरी आहे. काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिला होता. मुलीबाबत समस्या होती. आता त्यांच्या पक्षाचे विघटन झाले आहे. त्यांच्या ताज्या विधानाचा अर्थ असा आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकते, कदाचित त्यांना तशी भीती वाटते. काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही” असं संजय निरुपम म्हणाले.
शरद पवार त्यांच्या गटाच्या काँग्रेसमधील विलिनीकरणावर काय म्हणाले?
आपल्या पक्षाच्या विलीनीकरणा संदर्भात शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचारांची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे”