मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी घालून दिलेल्या विचाराने हा देश मार्गक्रमण करत असून, गांधी विचार जगाने स्विकारलेला आहे. गांधींची अहिंसेची शिकवण हीच देशाला तारणारी आहे. मात्र मागील 7 वर्षापासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा (bjp) सरकारकडून गांधी विचार पद्धतशीरपणे संपवण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यभर एक संदेश जावा यासाठी येत्या 30 जानेवारीला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर गांधीचे विचार आणि अहिंसेची शिकवण पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे पटोले यांनी म्हटले आहे. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यासमोर सर्व पक्षांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
30 जानेवारी हा अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या गांधींच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. गांधी विचार ही काळाची गरज आहे. हा विचारच देशाला तारणारा आहे परंतु तो विचारच संपवण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळ्यात वाजवली जाणारी ‘अबाइड विद मी’ ही महात्मा गांधी यांची आवडती धूनही आता बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच ‘मोनिका माय डार्लिंग’ या फिल्मीगाण्यावर सैन्यदलाचे जवान डान्स करतील असा व्हिडीओ केंद्र सरकारने ट्वीट केला आहे. हा सैनिकांची थट्टा करण्याचा प्रकार आहे. हे थांबवून ‘अबाइड विद मी’ हीच धून वाजवली जावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणारा चित्रपट why I killed Gandhi ? प्रदर्शित होत आहे. गोडसेला हिरो करण्याचे काम केले जात आहे, ते आम्ही खपवून घेणार नाही. हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पंतप्रधान मोदी यांच्याकडेही पत्रादावारे मागणी करण्यात आली आहे. असे पटोले यांनी सांगितले.केंद्र सरकारने परवाच दिल्लीतील ‘अमर जवान ज्योत’ विझवून जवानांच्या शौर्य, त्याग व बलिदानाचा अपमान केला. स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली 1971 साली पाकिस्तानला धडा शिकवून बांग्लादेशाची निर्मिती करण्याचा इतिहास घडवला. त्याची साक्ष देणारी अमर जवान ज्योत विझवली. इंदिरा गांधी यांच्यासारखे कर्तृत्व नाही म्हणून त्यांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
कोल्हापूर उत्तरची जागा बिनविरोध होणार? बंटी पाटलांनी काय फिल्डिंग लावली? वाचा सविस्तर
Air India : प्रजासत्ताक दिनानंतर एअर इंडिया टाटाकडे सोपवली जाणार, 18 हजार कोटी रुपयांत मालकी
Balasaheb Thackeray यांच्या जयंतीला Rahul, Priyanka Gandhiनी एक ट्वीटही केलं नाही -Devendra Fadnavis