(संदीप राजगोळकर) महाराष्ट्रात लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होणार आहेत. निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आजपासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. याच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबत झाली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत चर्चा केली. काँग्रेस विधान परिषदेच्या 11 पैकी 3 जागा लढवणार आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि विधान परिषद उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी काल रात्री उशिरा नाना पटोले दिल्लीत दाखल झाले.
काँग्रेसच्या बैठकीत ज्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली, त्यांची नाव टीव्ही 9 मराठीकडे आली आहेत. माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी आणि संध्या सव्वालाके या चार उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची महत्त्वाची पद भूषवली आहेत. नसीम खान हे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असताना मंत्री होते. आता काँग्रेस चौघांपैकी कुठल्या तीन उमेदवारांना संधी देते, ते लवकरच समजेल.
बैठकीसाठी महाराष्ट्रातून कुठले नेते दिल्लीत?
दरम्यान थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेस मुख्यालयात ही महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकांची तयारी आणि विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठीकत चर्चा होईल. बैठकीसाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी चार वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत होणार बैठक होईल.