पुणे (योगेश बोरसे) | केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? या बद्दल निर्णय दिला. निवडणूक आयोग शिवसेनेपेक्षा वेगळा निकाल देणार का? या बद्दल उत्सुक्ता होती. कारण शरद पवार अजूनही राजकारणात सक्रीय आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच संविधान शिवसेनेपेक्षा वेगळं आहे, त्यामुळे निकाल दुसरा लागणार का? याकडे जाणकराच लक्ष लागलं होतं. पण निवडणूक आयोगाने बहुमत कोणाच्या बाजूने? हे पाहून निकाल दिला. सहाजिकच या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, हे देखील तितकच स्पष्ट आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जो निकाल दिला, त्यावर आता घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया आली आहे.
“कालच्या निकालामुळे लोकशाहीची अधःपतन झालं आहे. शिवाय घटनेची पायमल्ली झाली आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द झाला पाहिजे. शिवाय कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणे चुकीचे आहे” असं उल्हास बापट म्हणाले. “कालच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांवर परिणाम होणार नाही, मात्र ते काय निकाल देतील ते आपल्याला माहिती आहे” असं उल्हास बापट म्हणाले.
विधानसभेतही तेच घडणार?
निवडणूक आयोगाने आधी शिवसेनेच्या बाबतीत निकाल दिला. एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने वैध मानलं. याच गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर विधानसभेत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा विषय होता, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतला. उदहारणार्थ पक्षाची घटना. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा विधानसभा अध्यक्ष याच गोष्टी पाहतील, अशी दाट शक्यता आहे.