लखनौ : ‘उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार आल्यापासून मोठ मोठे गुंडही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणतात, की आम्हाला अटक करा, नाहीतर आमचा एन्काऊंटर होईल’, असे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. ते उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आहे. याचा संदर्भ देत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, ‘2 वर्ष झाले, उत्तर प्रदेशमध्ये असे सरकार दिले आहे, की कुणाचीही आई-बहिणींकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. मोठ मोठे गुंड म्हणून फिरणारेही आज पोलीस स्टेशमध्ये जाऊन आम्हाला अटक करा, नाहीतर आमचा एन्काऊंटर होईल, असे म्हणतात.’
अमित शाह यांनी संबंधित दावा केला असला तरी, उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या सरकारच्या काळातच भाजपचे आमदार कुलदिप सिंह सेनगर यांच्यावर उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेण्यासाठी आणि आरोपी आमदार सेनगर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या घरासमोरच झाला होता. त्यानंतर माध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्याने अखेर सेनगर यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, असोसिएशन फॉर डेमॉक्रेटीक रिफॉर्म या संस्थेने देशभरातील लोकप्रतिनिधींच्या (खासदार/आमदार) मागील निवडणूक प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला होता. त्यातून तयार केलेल्या अहवालात महिलांविरोधी गुन्ह्यांमध्ये भाजपच्याच खासदार/आमदारांचा पहिला क्रमांक असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे शाह यांच्या दाव्याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत.