वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सत्ताधारी नगरसेविकांमध्ये जमिनीच्या वादातून हाणामारी झाली. ही घटना आज दुपारी घडली. आधी शिवसेना नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेविका श्रेया मयेकर यांना मारहाण केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते शिवसेना नगरसेवक सुमन निकम यांच्या घरावर चाल करुन गेले आणि निकम यांना मारहाण केली. शांत आणि सुसुंस्कृत वेंगुर्ला शहर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या बदल्याच्या राजकारणामुळे हादरले आहे.
शिवसेनेच्या गोटातील अपक्ष नगरसेविका सुमन निकम आणि त्यांचे पती स्वीकृत नगरसेवक संदेश निकम यांनी भाजप नगरसेविकेला मारहाण केल्याची घटना घडली. याचा बदला घेण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी निकम यांच्या घरात घुसून निकम दाम्पत्याला मारहाण केली आहे. यात महिला नगरसेविका सुमन निकम या जखमी झाल्या.
दरम्यान, या मारहाणीत भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार हे देखील सहभागी असल्याचा आरोप सुमन निकम यांनी केला आहे.
“दोन नागरसेविकांमधील वैयक्तिक भांडणात आम्ही राजकारण आणले नाही. परंतु भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी यात पक्षीय राजकारण आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. हे आम्ही सहन करणार नाही”, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघातील ही घटना असल्याने, ते यावर काय भूमिका घेतात आणि पावलं उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.