मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दोन दिवसांपूर्वी एकाच मंचावर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ऐंशी कोनात बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे आंबडेकर-ठाकरे युतीची चर्चा सुरू असतानाच या युतीला शह देण्यासाठी आता शिंदे गटही मैदानात उतरला आहे. शिंदे गट आणि दलित पँथरची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या युतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
येत्या 25 नोव्हेंबर रोजी कराडमध्ये दलित पँथरच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटासोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ शिंदे गटाला भेटून युतीचा प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे- आंबेडकर युतीला शह देण्यासाठीच शिंदे गटाकडून ही खेळी खेळण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात दलित पँथरची ताकद म्हणावी तितकी नाही. शिवाय पँथरमध्येही दोन तीन गट आहेत. त्यामुळे यापैकी कोणता गट शिंदे गटासोबत जाईल यावर बरंचसं राजकीय गणित अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात दलित पँथरने फारश्या निवडणुका लढवलेल्या नाहीत. त्यामुळे शिंदे गटाशी युती केल्यानंतर त्यांना कितपत प्रतिसाद मिळेल याबाबतची साशंकता आहे.
महाराष्ट्रात दलित चळवळीत केवळ प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्याकडेच जनाधार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते ज्या पक्षासोबत असतात त्यांना राजकीय फायदा होतो आणि ज्यांच्यासोबत नसतात त्यांना राजकीय तोटा होतो.
गेल्या काही वर्षापासून तर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याने त्यांच्या मतांचा टक्काही वाढला आहे. दलितच नव्हे तर, मुस्लिम, धनगर, ओबीसी, मराठा, भटक्या समाजातील मतेही वंचितला मिळत आहेत. त्यामुळे आंबेडकर हे ज्यांच्यासोबत जाणार त्यांना मुंबईसह इतर राज्यातील महापालिका निवडणुकीत भरघोस यश मिळेल, असं राजकीय जाणकार सांगतात.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले असून आंबेडकर यांनीही त्याला अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, या दोघांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून करण्यात येत असलेल्या खेळीला किती यश मिळतं हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.