Ajit Pawar On Corruption : राज्याच्या राजकारणात कथित सिंचन घोटाळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले. आता अजित पवारांनी कथित सिंचन घोटाळ्याच्या आरोपाबद्दल थेट प्रतिक्रिया दिली. “माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल”, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरद्वारे एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
“राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेऊन त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आला आहे. त्यामुळे जे लोकं बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा ही तीच लोकं आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारात येऊ द्यायची नाही. ही तीच लोकं आहेत, ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे. मी अर्थसंकल्पात राज्यातील गोर गरीब कुटुंबांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली, त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळतात. माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांचे दु:ख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दु:खावर फुंकर घालायचा प्रयत्न केला.
अर्थसंकल्पात आम्ही ४४ लाख शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं आहे, हे सहन होत नाही. म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्यावर्षी ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं. तर त्याला विरोध का? यावरुनच कोण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करतंय आणि कोण शेतकरी विरोधी आहे, हे आपल्या लक्षात आलंच असेल. काही जण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुरेशा रक्कमेची तरतूद नसल्याची तक्रार करत आहेत. मी जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होतो, त्यावेळी बहुतेक ही लोकं झोपलेली असावीत. आम्ही दुग्ध उत्पादकांसाठी प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आणि या लोकांना त्याची खबरबातच नाही. आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार बोनस त्याठिकाणी दिला जात आहे.
इतकं सगळं करुनही हे लोक आम्ही काहीच केलं नसल्याच्या बोंबा मारत आहेत. त्यात काही तथ्य नाही. अर्थसंकल्प ग्रामीण भागावर विशेष लक्ष देणारा आहे. पण माझ्या विरोधकांना त्याचं काय राज्याच्या विकासाशी काही देणं-घेणं नाही. यांना फक्त राजकारण करायचं आहे. गावगाड्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी, दुरुस्तीसाठी आम्ही ७ हजार ६०० कोटींचा निधी दिला. पण यांच्या पोटात दुखायला लागलंय. गावखेड्यातला माणूस लवकर शहरात पोहोचून तिथलं काम आटोपून रात्रीच्या जेवणासाठी घरी परत यावा, याची व्यवस्था आम्ही करतोय आणि विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्यात.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे विकास. विरोधकांकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही मात्र अशा प्रकारच्या घाणेरड्या राजकारणामध्ये अडकू नका. तुम्ही फक्त याकडे लक्ष असू द्या की तुमच्या दारात विकासाची गंगा कोण घेऊन आलंय. विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलतंय आणि तुमची कामं कोण करतंय, कुणाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे काम करण्याचा, काम करुन घेण्याचा आणि काम करुन दाखवण्याचा हे लक्षात घ्या. केवळ भाषणाबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जरा जपूनच आणि दूर राहा. जे नेते काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांनाच मतदान करा.
तुम्हाला आठवत असेल २०१४ साली मी शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना सुरु केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल कमी झाले. सोलापूर पाटबंधारे प्रकल्प, पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो, खराडी आयटी पार्क, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, कोल्हापूर औद्योगिक क्षेत्र असे प्रकल्प आणि पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती अशाप्रकारच्या अनेक कितीतरी शहरांचा कायापालट कोणी केला हे तुम्हाला माहितच आहे. अशी एक ना अनेक नावं घेता येतील. कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल, त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकास कार्याची सुरुवात कोणी केली. या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या दादाचा वादा बघायला मिळेल याची मला खात्री आहे.
राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारचं. जो जास्त काम करतो, त्याला तर थोडा जास्तीचा विरोध होतो. म्हणूनच सहन पण करावा लागतो. म्हणूनच माझ्यावर मधल्या काळात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांप्रमाणे सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सगळ्यांना दिसतंय. या पुढच्या काळात देखील असंच दिसत राहील. या विकासाच्या मॉडेलची पायाभरणी आम्ही करतोय, त्यावर विकसित महाराष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न साकार होईल. या कार्यासाठी मला राज्यातील १३ कोटी जनतेची साथ हवी आहे. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की प्रगत आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमच्यासोबत या आणि आमचे हात बळकट करा”, असे अजित पवारांनी म्हटले.