Devendra Fadnavis Comment Pankaja Munde : भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी पाच नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर दिसत आहेत. त्यापाठोपाठ योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोखले, सदाभाऊ खोत यांची नावे आहेत. भाजपकडे विधान परिषदेत 5 आमदार निवडून येतील इतकं संख्याबळ आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा ताईंना विधानपरिषदेत उमेदवारी दिली जावी, असा आमचा आग्रह होता. केंद्रीय भाजपने हा आग्रह मान्य करत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासाठी आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच नावं जाहीर झाली आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विशेषत: आमच्या सर्वांचा आग्रह होता की पंकजा ताईंना विधानपरिषदेत उमेदवारी दिली जावी. केंद्रीय भाजपने हे मान्य केले आहे आणि त्यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी केलेले ते विधान अत्यंत चुकीचे, आक्षेपार्ह आणि संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारे आहे. लोकसभेत तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजेत. राहुल गांधींनी संपूर्ण हिंदूंची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी आमची जाहीर मागणी आहे.
दरम्यान, पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत मुंडे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त मुंडे समर्थकांनी एकत्र येत पंकजा मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत हा आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडत हा जल्लोष साजरा होत आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. मात्र अखेर भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. पंकजा मुंडेंच्या या निवडीनंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या संधी नंतर नेमके जिल्ह्यातील राजकीय समीकरण कसे बदलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे