विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 12 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी केसरकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आपल्या पाठीमागे दोन गाड्या लागल्या होत्या. तसेच काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपली गाडी अडवली होती, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. आपल्याला मिळालेल्या अशा वागणुकीमुळे इतर आमदारांनादेखील असुरक्षित वाटत होतं, असा दावा दीपक केसरकर यांनी केला. त्यावेळी त्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला.
वकील देवदत्त कामत – भरत गोगावले यांनी ४ जुलै २०२२ रोजी तुमचा पोहोच घेतली होती का?
मंत्री दीपक केसरकर – मला आठवत नाही
कामत – सुनील प्रभू यांना तुम्ही हे पत्र लिहिले आहे का?
केसरकर – हो
कामत – २२ जून २०२२ रोजी तुम्ही बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे तुम्ही या पत्रात नमूद केले होते. हे खरे आहे का?
केसरकर – मी नुकतेच सांगितले की २१ जून २०२२ रोजीच्या बैठकीनंतर आम्ही काहीजण उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेंट रेगिस या हॉटेलवर गेलो. हॉटेलवर पोहचल्यानंतर मी माझ्या पत्नीला बरे नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांना दिली. कोविडमुळे तिथे तिची काळजी घेण्यासाठी कुणीही नव्हते. त्यामुळे मी माझ्या घरी निघालो, पण काही कार्यकर्त्यांनी माझी गाडी अडवली. काही जणांच्या मध्यस्तीनंतर मला निघता आले. पण दोन गाड्या माझ्या गाडीचा पाठलाग करत होत्या. माझ्या घराबाहेर त्या गाड्या थांबून होत्या. मी अनिल देसाई यांना कॉल करून सांगितले की या गाड्या माझ्या घरासमोरून जात नाहीत तोपर्यंत मला सुरक्षित वाटणार नाहीत. तसेच मी मुक्तपणे काम करू शकणार नाही. तरीही त्या गाड्या त्याच ठिकाणी होत्या. मी पत्रकार परिषद बोलवत हा सर्व प्रसंग सांगितला. या प्रसंगाचा मोठा धसका माझ्या पत्नीने घेतला होता. त्यामुळे तिच्या प्रकृतीवरही गंभीर परिणाम झाला. त्यानंतर सुनील प्रभू यांचे पत्र मला आले. त्यात शिवसेना विधीमंडळ पक्षाची बैठकीची माहिती होती. मी माझ्या कर्मचाऱ्यास सुनील प्रभू यांकडे पाठवले, पण माझ्या पत्राचा कोणताही रिप्लाय मिळाला नाही, एवढेच नव्हे तर संरक्षणही मिळाले नाही. या पत्रात मला सुरक्षितपणे वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी विनंती केली होती.
कामत – स्थानिक कार्यकर्ते तुमच्यावर का रागवले होते? तुम्ही तर मुंबईत होता, गुवाहाटीला गेला नव्हता?
केसरकर – माझ्या माहितीप्रमाणे, सर्व आमदारांना हीच भीती होती. ज्याप्रकारे मला वागणूक मिळाली तीच त्यांना बैठकीस उपस्थिती दर्शवल्यानंतर मिळाली असती, मुंबईत मुक्त आणि सुरक्षित वातावरण नव्हते. आमदार आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा द्या या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते वातावरण तयार झाले.
कामत – शिवसेनेचे कार्यकर्ते हे शिवसेना राजकीय पक्षाचे पाया आहेत. हे खरे आहे का?
केसरकर – हो
कामत – Kesarkardeepak@gmail.com हा तुमचा ईमेल आयडी आहे का?
केसरकर – हा माझा ईमेल आयडी आहे, पण तो मी वापरत नाही.
कामत – तुम्ही दाखल केलेले प्रतिज्ञापत्र चुकीचे आणि दिशाभूल करणारी आहेत
केसरकर – हे खोटे आहे
कामत -२५ जून २०२२ रोजी दिलेल्या मुलाखतीत तुम्ही ‘शिवसेना बाळासाहेब असा आमचा वेगळा गट आहे,’ असे म्हटले आहे. आमच्याकडे स्वतंत्र नेता आणि कार्यालय आहे, एखाद्या पक्षाप्रमाणे… असे म्हटले होते
केसरकर – हा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे
कामत – तुम्हाला शिवसेना राजकीय पक्षामधून वेगळे व्हायचे होते आणि दुसरा राजकीय पक्ष सुरु करायचा होता. म्हणून तुम्ही ते वक्तव्य केले होते.
केसरकर – आम्ही कधीच पक्ष सोडला नाही. वाटलं तर मी माझे व्हिडिओचे क्लिप या ठिकाणी सादर करतो. आम्ही शिवसेना आहोत, आमच्यामध्ये मतांतर असली तरी आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही. तेवढेच नाही तर मी उद्धव ठाकरे यांना माझ्यासह सर्वांना संरक्षण देण्याची मागणी केली होती आणि त्यांना शिवसेनेच्या मूळ विचारधारेसोबत गेल्यास आम्ही मुंबईत परतण्याचे आश्वस्तही केले होते. त्यामुळे पक्ष सोडण्याचा संबंधच येत नाही. आम्ही कधीच पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व आमदारांतर्फे मी बोलत असताना आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत आणि आम्ही पक्ष सोडणार नाही हे वारंवार सांगितले आहे.
कामत – देशाच्या संविधानातील शेड्युल १० अनुसार तुमच्यावर अपात्रतेची कारवाई होईल या भीतीने तुम्ही हे बोलत आहात. कारण अध्यक्षाची निवडणूक आणि बहुमत प्रस्ताव विरोधात हे दोन्ही उल्लंघन केल्यामुळे हे कारवाई अटळ होती. हे खर आहे का?
केसरकर – हे खोटे आहे. आम्ही शिवसेनेचे सदस्यत्व कधीही सोडले नाही. आम्ही आजही शिवसेनेचे सदस्य आहोत. मला सुनील प्रभू यांच्याकडून कोणताही व्हीप मिळाला नाही. याउलट मला भरत शेठ भोगावले यांच्याकडून एक व्हीप मिळाला. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकसाठी ४ जुलै २०२२ रोजी उपस्थित राहण्यासंदर्भातील हा व्हीप होता.
कामत – स्थानिक कार्यकर्ते का रागावले होते आणि धमकावत होते?
केसरकर – माहीत नाही.
कामत – या स्थानिक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना धमकावले होते का?
केसरकर – मला असे वाटते की हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. कारण, ज्यावेळी आम्ही सेंट रेजिस हॉटेलला पोहोचलो त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना धमकी दिली असे मला वाटत नाही.
कामत – मला असे म्हणायचे आहे की शिवसैनिक हा पक्षाचा पाया आहे.
केसरकर – होय
कामत – kesarkardeepak@gmail.com हा तुमचा ईमेल आयडी आहे
केसरकर – हा माझा इमेल आयडी आहे. पण तो मी वापरत नाही.
कामत – तुम्ही मुलाखतीत म्हणालात की आम्ही शिवसेना बाळासाहेब हे नाव घेऊ
केसरकर – चुकीचा अर्थ लावला असून हे चुकीचे आहे.
कामत – भरत गोगावले यांनी टपाल पेटीत टाकलेले व्हीपची कॉपी आमदारांनी वाचल्याचं तुम्ही पाहिलं का?
केसरकर – मला माहीती नाही
कामत – तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने मतदान केल्याचं यापूर्वी सांगितलं, याउलट तुमच्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही शिवसेना विधिमंडळ पक्षाने बजावलेल्या व्हीपप्रमाणे मतदान केल्याचं स्पष्ट केलं आहे. तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे?
केसरकर – हे नजरचुकीने झाले. मी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं, हे मात्र खरं आहे.