निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीने काल शिवाजी पार्कावर संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीतून प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच राज्य सरकारलाही फैलावर घेतलं होतं. या रॅलीनंतर आज मंत्री दीपक केसरकर यांनी अचानक प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. आंबेडकर यांच्या घरी जावून दीपक केसरकर यांनी ही भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंबेडकर आणि केसरकर यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? ही भेट म्हणजे मोठ्या हालचालीचे संकेत आहेत की नुसतीच सदिच्छा भेट आहे? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.
मंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. दादर येथील राजगृह या आंबेडकर यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दीपक केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधून या भेटीचं कारण स्पष्ट केलं. आज संविधान दिन आहे. त्यामुळे आंबेडकर यांना भेटून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो. महाराष्ट्रातील विचारवंतांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे विचार महत्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपण्याकरता आमच्यात समन्वय आहे, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळलं.
हिंगोलीत ओबीसी एल्गार परिषदेला जात असताना मंत्री छगन भुजबळ यांचा तीन वेळा ताफा अडवण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा संघर्ष थांबला पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा याला काही मर्यादा आहेत. मुलांचं भविष्य महत्वाचं आहे. महाराष्ट्र शांत राहिला नाही तर गुंतवणूकदार महाराष्ट्रात येणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. आमच्यात कोणताही वाद होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मनसेने आजपासून मराठी पाट्यांसाठी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दुकानांवर मराठी पाट्या असणं आवश्यकच आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुरेशी मुदतही दिली आहे. जे मराठी पाट्या लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जर कोणी दुकानांवरील पाट्यांना काळं फासलं म्हणून गुन्हा दाखल केला असेल तर मराठी पाटी नसेल तरी देखील कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले. जे दुकानांवरील पाट्यांना काळं फासतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.