शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदावरून भुवया उंचावणारं विधान केलं आहे. फिरता मुख्यमंत्री कधी ऐकलं नाही. फिरता चषक ऐकला आहे. कुणालाही मुख्यमंत्री करा. पण महाराष्ट्राला स्टेबल मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या विधानानंतर त्यांनी लगेचच सध्यातरी मुख्यमंत्री पदाचा पहिला पर्याय एकनाथ शिंदे हेच आहेत. एकनाथ शिंदे हे कलेक्टिव्ह नेतृत्व आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपावर भाष्य केलं होतं. त्यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजही भाजपकडे 100 हून अधिक आमदार आहेत. तरीही मोठा भाऊ, लहान भाऊ ही भावना कुणाच्या मनात नाहीये. भाजपच मोठा भाऊ आहे. पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. जागा वाटपात भाजप मोठा भाऊ ठरेल यात काही शंका नाही, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब असताना एक सूत्र होतं. दिल्ली भाजपने सांभाळावी आणि महाराष्ट्र शिवसेनेने, असंही त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यावरही केसरकर यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडीत तर अस्वस्थता आहेच. मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात अस्वस्थता आहे. म्हणूनच महाविकास आघाडीवाले मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करत नाहीयेत. त्यांच्यासोबत आता फतवे काढणारे आहेत. तर आमच्यासोबत सच्चे शिवसैनिक आहेत, असं सांगतानाच महायुतीत कोणताही भूकंप होणार नाही. आम्ही विचारधारेच्या मुद्द्यावर सोबत आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. महिलांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. आम्ही सर्व माहिती राज ठाकरे यांना देऊ आणि त्यांच्या गैरसमज दूर केला जाईल, असं ते म्हणाले.
दीपक केसरकर यांनी धर्मवीर सिनेमावरून उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. पाच पाच तास आमदारांना उभ करायचं, साहित्यिकांना बाहेर उभ करायचं, हा अपमान महाराष्ट्राला सहन होत नाही. सिनेमातून हे सत्य बाहेर आलं आहे. मला देखील बाहेर उभ राहावं लागलं आहे. भेटीसाठी बोलावलं असताना भेटही रद्द केल्याचे प्रकार घडले आहेत, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
सिनेट निवडणुकीत युवा सेनेला दहा पैकी दहा जागा मिळाल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही सिनेटच्या निवडणुकीत पडलो नाही. आम्हीही मेंबर केले असते तर आम्ही पण निवडून आलो असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.