मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे प्रचंड पडसाद उमटत आहेत. राजस्थानी आणि गुजराती लोक महाराष्ट्रातून बाहेर काढल्यास महाराष्ट्रात पैसा उरणार नाही, असं वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं. त्यावरून मनसे, शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीने राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेने तर शिंदे गट या मुद्द्यावर का गप्प आहे? असा सवाल करून शिंदे गटावरही हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी सारवासारव केली आहे. राज्यपालांनी अशी वादग्रस्त विधाने करू नयेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत नाहीत. ते आल्यावर केंद्र सरकारशी या संदर्भात बोलतील. त्यानंतर राज्यपाल अशी वादग्रस्त विधाने करणार नाहीत, अशी आमची खात्री आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
ज्या लोकांनी पैसा कमावला त्यांनी मुंबईत येऊन पैसा कमावला आहे. इथे आलेल्या माणसांचा मराठी माणसाने आनंदाने स्वीकार केला आहे. मराठी माणूस बुद्धिमान असतो. मेडिकल, वकिली, चार्टेड अकाऊंटट या क्षेत्रात मराठी माणूसच टॉपमोस्ट माणूस आहे. पण व्यापारात मराठी माणसाचा कल राहिला नाही ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच राज्यपाल घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांनी अशी विधाने करू नये हे केंद्राला कळवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा मुख्यमंत्री मुंबईत येतील तेव्हा ते केंद्राशी चर्चा करतील. अशा पद्धतीचे विधाने होऊ नये याची खात्री करतील, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
शहर आणि राज्याच्या विकासात सर्वांचं योगदान आहे. मुंबई आर्थिक राजधानी का आहे? मुंबईत रिझर्व्ह बँक, इतर बँका आणि शेअर बाजारही इथेच आहेत. इतर समाजाचाही मुंबईत मोठा वाटा आहे, असंही केसरकर यांनी सांगितलं.
यावेळी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. केसरकरांची भूमिका बरोबर आहे. मराठी माणूस महत्त्वाचा आहे. त्यामुळेच गुजराती आणि राजस्थानी लोक आले आहेत. मराठी माणूस कुठेच कमी नाही. मराठी माणसाने सातासमुद्रापार झेंडे फडकावले आहेत. राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. मराठी माणसाच्या कष्टावरच गुजराती आणि राजस्थानी लोक व्यापार करतात. पैसा कमावतात. शिंदे यांचं मत, त्यांचा विचार याच्याशी मला काही घेणं नाही. राज्यपालांनी मराठी माणसाच्या कष्टाचा, परिश्रमाचा अपमान केला आहे. राज्यपाल सातत्याने मराठी माणसाचा अपमान करतं. केंद्र आणि राज्य सरकार ते सहन करत आहे, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून राज्यपालांवर टीका केली. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना? की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता.