मुंबई: येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) एकत्र येऊन चर्चा करतील, असा दावा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी केला होता. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शिवसेनेतूनही सय्यद यांना या ट्विटवरून फटकारल्याची चर्चा होती. त्यानंतर सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मी दोन्ही नेत्यांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं तेच मी ट्विटमध्ये मांडलं आहे. दोन्हीकडच्या आमदारांचीही तीच भावना आहे, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर हे संकट ओढवल्याची चर्चा आहे. त्यावर मात्र त्यांनी राऊतांची पाठराखण केली. ते वाट्टेल ते बोलतात. काहीही बोलतात. ते बिनधास्त बोलतात. पण ती त्यांची शैली आहे. त्यामागे शिवसेनेला सपोर्ट करणं हीच त्यांची भावना असते, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यांना शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं.
मी शिवसैनिक आहे. आमचे शिवसैनिक एकत्र येत असतील तर मी सर्वांचेच आभार मानेल. भाजप असो, शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो सर्वांचे आभार मानेन. मी सर्व ठिकाणी गेले. अनेक नेत्यांना, आमदारांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं. दोन्ही ग्रुपमध्ये इगो हर्ट आहे. तो तुटला तर या गोष्टी पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं.
दिगंबर नाईक हा सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या ग्रुपमध्ये होता. मला शिंदे यांनी सेनेत आणलं. त्यांच्यामुळे मी पक्षात काम करतेय. पण माझे नेते उद्धव ठाकरे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता प्रत्येक पक्ष आपआपला विचार करतोय. नैसर्गिक युती होत असेल, चांगल्यासाठी होत असेल तर झाली पाहिजे. शिंदेंची घरवापसी झाली पाहिजे. एका घराचे दोन तुकडे नको. येणाऱ्या काळात हे होईल असं मला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.
दोन्ही नेते दोन दिवसात भेटतील हे मला अजूनही वाटतं. दोन्ही ठिकाणी माझं बोलणं झालं आहे. मला जे काही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं तेच मी ट्विटमध्ये मांडलं आहे. मला जे काही दिसतंय जे बघतेय. यात याला टोचून बोलणं, त्याला टोचून बोलणं सुरू आहे. प्रत्येकाने शांततेने प्रयत्न केले तर त्यातून नक्कीच मार्ग निघेल, असंही त्या म्हणाल्या.