नवी दिल्ली : मोदी सरकारने गुरुवारी (6 जून) मंत्रिमंडळाच्या आठ समित्यांची स्थापना केली. विशेष म्हणजे, या आठपैकी केवळ दोन समितींमध्येच भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आणि तातडीने राजनाथ यांना आणखी चार समित्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ समित्यांची स्थापना करण्यात आली. केंद्रीतल वरिष्ठ मंत्र्यांचा विविध समित्यांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठ मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश मात्र दोनच समित्यांमध्ये करण्यात आला होता. आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्राशी संबंधित दोन समित्यांमध्ये राजनाथ सिंह यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राजनाथ सिंह हे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर, तातडीने रातोरात राजनाथ सिंह यांना आणखी चार समित्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले.
या समित्यांमध्ये भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सर्व 8 समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. अमित शाह यांच्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण अशा मंत्री आहेत, ज्यांना आठपैकी सात समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पाच, तर रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि नरेंद्रसिंह तोमर यांना प्रत्येकी चार-चार समित्यांमध्ये घेण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव संसदीय आणि घरकुल समिती वगळता इतर 6 समित्यांमध्ये आहे. आता नव्या सुधारणांनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचेही नाव 6 समित्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
समित्यांमधील मंत्र्यांच्या समावेशावरुन केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांमधील मानपमान नाट्य मात्र समोर आलं.
पंतप्रधान मोदी सुरक्षा समितीचे प्रमुख
सुरक्षेसंदर्भातील समितीचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाही सुरक्षेसंदर्भातील समितीत स्थान देण्यात आले आहे.
आर्थिक समितीत सर्व वरिष्ठ मंत्री
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्याने स्थापन झालेल्या आर्थिक समितीत सर्व वरिष्ठ मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत आर्थिक समितीची स्थापना करण्यात आली असून, यात अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारामण, नरेंद्रसिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, एस. जयशंकर, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे.