मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) हे अभियान यशस्वी केल्यानंतर आता राज्यात अजून एक अभियान राबवलं जाणार आहे. राज्यात 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 ते 11.01 मिनिटे या कालावधीत नियोजित ‘सामूहिक राष्ट्रगीत (National Anthem) उपक्रमात’ सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम निर्माण करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम साजरे केले जात आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू आहे. या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलीय.
राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान – थोर, स्त्री – पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी सहभाग घेणं अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावं, असे आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
Media Interaction on eve of Monsoon Session of Maharashtra Legislature.@mieknathshinde https://t.co/j8CXXoVeh2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2022
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. विरोधकांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यामधील एकीची चिंता केली पाहिजे. कारण तीन पक्षाच्या तीन वेगळ्या दिशा पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड आम्हाला न विचारता केली असं काँग्रेस नेते बोलले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सत्तेत असतानाही तीन पक्षामध्ये एकी नव्हती आता विरोधी पक्षात गरज असतानाही एकी दिसत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. आधी मंत्रालय, सह्याद्री, मंत्र्यांचे बंगले रिकामे होते, आता इथे पाय ठेवायला जागा नाही. मुख्यमंत्री मी आमचे नेते मैदानात आहेत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
मागच्या सरकारनं जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचं अंतर होतं. आमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेतला. पुरवणी मागण्या झाल्यानंतर आम्ही मदत द्यायला सुरुवात करु. आम्ही आताही मदत देऊ शकतो. पण 95 टक्के पंचनामे झाले आहेत. 5 टक्के बाकी आहेत. तर काही ठिकाणी पंचनाम्याबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.