मुंबई | 9 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘आपला बायोस्कोप 2023‘ या पुरस्कार सोहळ्यात भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. खरंतर या घटनांची सुरुवात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाली, असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून ते आतापर्यंत राजकारणात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. त्यानंतर आता भविष्यात पुढे काय घडणार ते महत्त्वाचं आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. या राजकीय घडामोडींच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपणच सत्तेत असू, असा मोठा दावा फडणवीसांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या कार्यक्रमात केला आहे.
‘टीव्ही 9 मराठी’चा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांच्या सन्मानाचा पहिला ‘आपला बायोस्कोप’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी फडणवीसांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सूचक वक्तव्य केलं.
“तुम्ही पहिल्या वर्षी आम्हाला बोलवलं. पुढच्या वर्षी आम्हालाच बोलवा. पुढच्याही वर्षी डिसेंबरमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मीच राहणार आहे. अर्थात याला एक कॅव्हिट आहे, रितेशजी राजकारणात यायचं नाही आणि आलात तर कुठून यायचं ते मी तुम्हाला सजेस्ट करतो. आमच्यासोबत अजित दादांनाही बोलवा तेही एक वेगळे कलाकार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“टीव्ही 9 मराठी न्यूज चॅनल अत्यंत वेगाने पुढे जाणारं न्यूज चॅनल आहे. आमचा इतका वैताग होतो की, तुमचे इतके कॅमेरामॅन आहेत. कुठेही गेलं तरी टीव्ही 9 चा कॅमेरामॅन येऊन उभाच असतो. तुम्ही सगळ्या गोष्टी टिपून घेता. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला ते माहिती आहे, न्यूज चॅनल पेक्षा जास्त लोकांचा इंटरेस्ट मनोरंजनाकडे आहे. लोकं राजकारण पाहून कंटाळतात. त्यामुळे माझा सल्ला आहे की, तुमच्या न्यूज चॅनलवर जास्त भर हा मनोरंजनाला देऊन टाका. 25 टक्के न्यूजकरता ठेवा”, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.