VIDEO | नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा फोन, म्हणाले “भाजप पक्ष…”

| Updated on: Aug 25, 2021 | 11:17 AM

भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय, अशी भूमिका फडणवीसांनी काल दुपारी पत्रकार परिषदेतही मांडली होती.

VIDEO | नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा फोन, म्हणाले भाजप पक्ष...
Narayan Rane, Devendra Fadnavis
Follow us on

मुंबई : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (CM Uddhav Thackeray) कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केल्या प्रकरणी राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंशी फोनवरुन संवाद साधला. भाजप पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा निरोप फडणवीसांनी राणेंना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“भाजप राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण…”

एखाद्याने वासरु मारलं म्हणून आम्ही गाय मारु, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय, अशी भूमिका फडणवीसांनी काल दुपारी पत्रकार परिषदेतही मांडली होती.

नारायण राणेंना जामीन

रत्नागिरी पोलिसांकडून अटक होण्यापूर्वी नारायण राणेंनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, रात्री उशिरा महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटींसह जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला.

कोर्टाकडून राणेंना अटीशर्तीसह जामीन

जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

काय आहे प्रकरण?

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

नारायण राणे यांना मोठा दिलासा, महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह जामीन मंजूर

नारायण राणेंच्या अटकेनंतर उस्मानाबादेत भाजप-सेना आमनेसामने, आमदार, खासदारांमध्ये ट्विटवॉर

VIDEO | मनोज वाजपेयीच्या चित्रपटातील डायलॉग, राणेंना जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री नितेश राणेंचे सूचक ट्वीट