VIDEO: आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलं; देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान

| Updated on: Mar 02, 2022 | 1:35 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी राऊत यांनी कारवाईची मागणीही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

VIDEO: आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलं; देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान
Devendra Fadanvis
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन आयटीमध्ये (IT scam) 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी राऊत यांनी कारवाईची मागणीही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलंय?, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी आघाडी सरकारला दिलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे भाजप मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजाला जपण्याचा, पोलरायजेशन करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारकडून केला जात आहे. संजय राठोडांचा राजीनामा लगेच होतो, पण देशद्रोह्यांसोबत असलेल्या वाचवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. त्यांच्यातील काही लोक दाऊदची धुणी-भांडी करतात. त्यांना आधी दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही असं सांगा. माझ्या पत्रकार परिषदेप्रमा्णे त्यांच्याही पत्रकार परिषद घ्या. फिक्समॅच करु नका, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बेवड्यांना समर्पित सरकार

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारमधील घोटाळ्यांवरही भाष्य केलं. परिक्षांचे घोटाळे संपले नाही, भ्रष्टाचाराने कळस गाठलाय, हे आजवरचं सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. कारकून साहेबाला लाच मागतोय. तुम्हाला 15 लाख मिळाले, मला 2 लाख का नाही? बंदुकीचा धाक दाखवल्याचेही प्रकार झाले आहेत. एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालं आहे. या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा. बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू, असा इशारा त्यांनी दिला.

अहंकारी सरकार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरूनही त्यांनी आघाडी सरकारवर हल्ला चढवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत हे सरकार कोडगं आहे. 80 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या यांना दिसत नाहीत. अहंकार डोक्यात जातो, आम्ही म्हणजे सत्ता, असं सरकार आता वागतंय. त्याचं प्रत्यंतर त्यांना पाहायला मिळेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

कितीही गोंधळ घाला, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी अधिवेशनापूर्वीच ठणकावले

VIDEO: तुमचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा इशारा

खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी निकटवर्तीयाला फसवले, आर्थिक व्यवहारातून कोट्यावधी रूपयाला फसवण्याचा आरोप