मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेचं आजचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्या, ओबीसी राजकीय आरक्षण, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठीचे प्रभाग ठरवण्याचे , आरक्षण ठरवण्याचे अधिकार सरकारकडे घेण्यात आले आहेत. त्या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा का दिला या संबंधी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना हिंदूह्रदयसम्राट म्हटलं होतं. भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदूह्रदयसम्राट कुणाला म्हणायचं असेल तर मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणेन, असं म्हटलं होतं. यासंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. नितेश राणे काय म्हणाले मला माहीत नाही… मी भाजपचा शिपाई आहे… आणि हिंदुत्ववादी नक्कीच आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज जे बील मंजूर झालंय त्यामुळं आतापर्यंत झालेली प्रभाग रचना, जिल्हा परिषद , पंचायत समिती, गट आणि गण असो, महापालिका असेल ती रद्द झाली आहे. आता सरकार प्रभाग रचना तयार करेली आणि ती निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. आम्ही ही मागणी केली होती पहिल्यांदा आमची मागणी मान्य केली आहे. काही अधिकार निवडणूक आयोगाकडे आणि काही अधिकार सरकारकडे जातील.
या विधेयकामुळं ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झालेला नाही. आता, राज्य सरकारला इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी काही कालावधी मिळेल. इम्पेरिकल डाटा सरकारनं तयार करुन तो सादर करावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. प्रभाग रचनेचा अंतिम अधिकार निवडणूक आयोगाकडे जाईल. ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय. सरकारला नव्यानं रचना करायची आहे. ते किती दिवसात करतात हे पाहावं लागणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यानं विजेचं कनेक्शन कापल्यानं फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडला. सरकारनं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापावी, अशी मागणी केली. हे सरकार कोडगं, असंवेदनशील आहे. हे सरकार बिल्डरांचं आहे, हे सरकार बेवड्यांकरता धोरण तयार करतं. शेतकऱ्यांनी नापिकी आणि इतर कारणांनी वीज कनेक्शन कापू नका अशी विनंती केली होती. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन मे पर्यंत कापणार नाही, असं म्हटलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ऊर्जा मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापलं जातंय. काही शेतकऱ्यांनी वीज बील थकवलं तरी डीपी काढून नेलं जात आहे. रब्बीचा हंगाम खराब झाला आता खरिपाचा हंगाम खराब होणार अशी स्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष सभागृहात मांडत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार देखील हीच मागणी करत होते. त्यांचा आवाज दडपण्यात आला. एक सुरज जाधव फेसबुक लाईव्ह करत देवाघरी गेला. आमची शेतकऱ्यांना विनंती आहे की आत्महत्या करु नका. आपण सरकारशी संघर्ष करु, अस्मानी आणि सुलतानी संकटाशी आपण सामना करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं!
विधेयक मंजूर झाल्याने ओबीसींना आरक्षण मिळणार का?, सरकारचं काऊंटडाऊन सुरू; फडणवीस नेमकं काय म्हणाले?