मुंबई : ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. खरं तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही. पण मी असं म्हणणार नाही. कारण मला हिंदुंची संख्या कमी करायची नाही. पण हे नक्की म्हणतो की तुम्ही म्हणजे हिंदुत्व (Hindutva) नाही’, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवलाय. महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपकडून सोमय्या मैदानावर बुस्टर सभेचं आयोजन करण्यात आलं. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. इतकंच नाही तर या सभेच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणुसाठी भाजपनं एकप्रकारे रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं.
आजचा दिवस हा अनेक महनियांना, हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस आहे. पण काही लोकांना असं वाटतं की ते म्हणजे महाराष्ट्र, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आणि त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान. पण लक्षात ठेवा महाराष्ट्राची 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. खरं तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही. पण मी असं म्हणणार नाही. कारण मला हिंदुंची संख्या कमी करायची नाही. पण हे नक्की म्हणतो की तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, असा घणाघातही फडणवीस यांनी यावेळी केलाय.
LIVE | #महाराष्ट्रदिन सन्मान सोहोळा सभेतून
सोमय्या मैदान, मुंबई#BoosterDose #MaharashtraDayWithBJP#Maharashtra https://t.co/sariy9DTyk— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2022
भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा, असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. 32 नावे आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती, असंही फडणवीस म्हणाले.
हनुमान चालिसा आता राजद्रोह होतो. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे? हनुमान चालिसाने केवळ रावणाचे सरकार उलथवले जाते, रामाचे नाही. आता सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या? असा सवालही फडणवीस यांनी शिवसेनेला केलाय. या देशात एक वाघ तयार झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने, ज्यांनी कलम 370 रद्द करून दाखविले. आता शिवसेना म्हणते, तुम्ही पाकिस्तानबद्दल काय बोलता, चीनबाबत बोला ना. काय अवस्था झाली शिवसेनेची? असा खोचक सवालही फडणवीस यांनी यावेळी केलाय.