MPSCला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

| Updated on: Jul 04, 2021 | 2:33 PM

स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी पुण्यातील तरुणाच्या आत्महत्येवर सरकारला चांगलंच धारेवर धरलंय

MPSCला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी पुण्यातील तरुणाच्या आत्महत्येवर सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. (Devendra Fadnavis criticizes Thackeray government over MPSC student suicide)

पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे. स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केलीय. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणावरुनही राज्य सरकारवर टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही फडणवीस यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा फटकारलंय. सरकार पोलीस यांच्यामार्फत लोकांना थांबवू शकेल. पण मनातील खदखद थांबवू शकणार नाही. भोसले समितीनं स्पष्ट म्हटलं आहे की, मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल. हा राज्य सरकारचा विषय आहे, केंद्र सरकारचा नाही, असा दावा फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलाय. इतकंच नाही तर आषाढी वारीवरुनही फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणं चुकीचं आहे. मोगलाई आणि निजाम काळातही असं झालं नव्हतं, अशा शब्दात फडणवीस यांनी वारीबाबतच्या निर्णयावर आक्षेप नोंदवलाय.

रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे विनंती करत MPSC परीक्षा त्वरित घेण्यात याव्यात तसंच प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, असं म्हटलं आहे. कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करुन सरकारकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

कोरोनानं परीक्षा लांबल्या, जाहिरात नाही, MPSC परीक्षांची वयोमर्यादा कधी वाढवणार? मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांचं पत्र

Devendra Fadnavis criticizes Thackeray government over MPSC student suicide