मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. उद्या होणारा मंत्रिमंडळ विस्तार छोटा असणार आहे. पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) छोटेखानी असणार आहे. पहिल्या विस्तारात केवळ 20 ते 25 मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. अधिवेशनानंतर इतर मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. अपक्ष आमदारांनाही अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाणार आहे. तसेच पूर्वी जे मंत्री होते, त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे. काहींची खाती बदलली जाणार आहेत. तर काहींना राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेटपदी बढती दिली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, शिंदे सरकारमध्ये (Eknath Shinde) भाजपचंच वर्चस्व राहणार आहे. एक तर भाजपकडे (bjp) सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थ आणि गृहखाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे शिंदे सरकारची आर्थिक नाडी ही फडणवीस यांच्या हातात राहणार असून महत्त्वाची खाती पदरात पडल्याने भाजपकडून निर्णयांचा धडका लावला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती केल्यानंतर राज्यात सरकार स्थापन झालं. पण गेल्या महिन्याभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तारच होत नव्हता. काही खात्यांचा तिढा सुटत नसल्याने विस्तार लांबला होता. शिंदे गटाला गृहखातं हवं होतं. पण भाजप गृहखात्यासाठी अडून बसला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटत नव्हता. अखेर शिंदे यांनी दोन पाऊल मागे जात भाजपला गृह खातं आणि अर्थ खातं दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या काळातही गृहखाते स्वत:कडे ठेवलं होतं. आताही त्यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे. तसेच आता अर्थ खातंही फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडे महत्त्वाची खाती आली आहेत. त्यामुळे फडणवीस आता निर्णयांचा धडाका लावणार असल्याचं सांगितलं जात आहे. फडणवीस हे उत्तम राजकारणी तर आहेतच, पण कुशल प्रशासकही आहेत. मागच्या सरकारच्या काळातही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले होते. आताही तोच कित्ता फडणवीस गिरवतील असं सांगितलं जात आहे.
फडणवीस यांच्यासमोर अनेक मोठे प्रकल्प आहेत. ते प्रकल्प त्यांना मार्गी लावायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेनचा प्रकल्प मार्गी लावायचा आहे. मेट्रो प्रकल्प, आरे कारशेडचा प्रश्न, समृद्धी महामार्ग, नाणार प्रकल्प, विदर्भातील प्रकल्प आदी विविध प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. त्यामुळे फडणवीस हे धडाकेबाज निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेच्या निवडणुका आल्याने फडणवीस धक्कादायक निर्णय घेऊन विरोधकांना धोबीपछाड करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच नवे प्रकल्प आणि नवे निर्णयही फडणवीस घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.