मुंबई : “मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशभरातील पाच राज्यांसह, पंढरपूर-मंदळवेढा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. पंढरपुरात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथी भालके यांचा 3700 मतांनी पराभव केला. या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली (Devendra Fadnavis first reaction on Pandharpur bypoll election result 2021).
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय. हे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर उपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरउपयोग केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘रणनिती आखून ही निवडणूक लढवली’
“आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचं अभिनंदन करतो. जमिनीशी जुळलेले व्यक्तीमहत्व म्हणून ते गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत प्रशांत पारिचारक आणि उमेश पारिचारक हे देखील राम-लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत उभे राहिलेत. रणनिती आखून ही निवडणूक लढवली गेली”, असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis first reaction on Pandharpur bypoll election result 2021).
‘पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला’
“आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बारा बलुतेदारात नाराजी होती, वीज तोडली गेली त्यावरुन जनता नाराज होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडलं”, असं मत त्यांनी मांडलं.
‘बंगालमध्ये भगव्याचं राज्य’
“आम्हाला इतर राज्यांतही योग्य यश मिळालं आहे. बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी चांगल्या जागा मिळाल्या नाही. बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. आता भगाव्याचं राज्य त्या ठिकाणी होत आहे. काँग्रेस म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी झाली आहे. शिवसेनेचा संबंध नाही, राष्ट्रवादी आज हरले, काँग्रेसला फटका पण ममता दीदी यशामुळे यांना इतका आनंद झालाय? या निवडणुकीत ममता यांना निवडून यायला दमछाक झाली हेही दिसलं”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
हेही वाचा : ‘गड आला पण सिंह गेला’, ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव