मुंबई : “आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो,” असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीदरम्यान केला. मुलाखतकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसोबतचे अनेक गौप्यस्फोट केले. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar Reveal BJP-NCP Alliance)
“अजित पवार हे संमतीने आले की संमतीविना आले हे अद्याप गुलदस्त्यात आहे, याबाबत तुम्ही अनेकदा योग्य वेळ आली तेव्हा सांगेन असं म्हणता,” असा प्रश्न राजू परुळेकर यांनी फडणवीसांना विचारला होतो. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “अनेक लोकं आता पुस्तक लिहितात. खरं पुस्तक मी लिहिणार आहे. कधी लिहायचं ते ठरवलं आहे. मग जेवढे पुस्तक लिहितात, त्यांची पुस्तक कशी गृहित धरुन लिहिलेली आहेत. हे त्यावेळी लक्षात येईल. कारण सर्व घटनाक्रम माझ्या डोक्यात आहे.”
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“आज तुमच्यासमोर गौप्यस्फोट करतो की, दोन वर्षापूर्वी एक स्थिती अशी होती की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असा निर्णय झाला. राष्ट्रवादी आणि भाजप जर सोबत येणार असेल तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. जर एकत्र जायचं असेल आणि काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल. शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असा निरोप गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“निवडणुकीनंतर ज्यावेळी शिवसेना येत नाही असं लक्षात आलं, तेव्हा आमच्याकडे कोणते पर्याय आहे याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला सोबत जाण्यासाठी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो.”
“एकदम टोकाच्या चर्चा झाल्या होत्या. ज्या चर्चा व्हायला हव्या त्या झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. आम्ही शांत बसून होतो. दोन ते तीन दिवस असे होते की आम्ही मनातून ठरवलं होतं की आपल्या हातात हे सरकार नाही. हे सरकार आता गेलं.”
“त्या तीन-चार दिवसात आम्ही कोणतीही कृती केली नाही. पण त्या तीन चार दिवसांनंतर अजित पवारांकडून आम्हाला फिलर आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “आमची त्यांच्याशी चर्चा झाली. मला हे मान्य नाही. जे शरद पवारांनी आधी सांगितलं होतं. माझं आजही स्पष्ट मत आहे की, स्थिर सरकार हे भाजप आणि राष्ट्रवादी होऊ शकेल. पण जर पवार आता शब्दावरुन बदलत असतील. तर मला हे तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही. यातून राज्याचं नुकसान होईल. म्हणून मी तुमच्यासोबत सरकार बनवायला तयार आहे. त्यांच्या आमदारांची संख्याही होती. त्यानंतर हा निर्णय झाला,” असे फडणवीस यावेळी म्हणाले. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar Reveal BJP-NCP Alliance)
हेही वाचा – सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं
“तो निर्णय चुकीचा होता हे चार वेळा मी कबूल केलं आहे. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा त्यांच्यासोबत नसतं गेलं तरी चाललं असतं असं वाटतं. पण त्याक्षणी वाटलं नाही. कारण ज्यावेळी तुमच्याशी सर्व धोका करतात. तुमच्या पाठीत सर्व जण खंजीर खुपसतात त्यावेळी राजकारणात जगावं लागतं. राजकारणात मरुन चालत नाही. मग अशा परिस्थितीत या महाराष्ट्राचा इतिहास आहे की कधीतरी गनिमी कावा करावा लागतो,” असे फडणवीस म्हणाले
“आपल्या मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो. तसा तो गनिमी कावा होता. त्यामुळे रात्री ठरलं, सकाळी केलं. जर सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आमच्याविरोधात गेला नसता तर 100 टक्के आजही आमचं सरकार टिकले असतं. त्याची व्यवस्था आम्ही केली होती. दुर्देवाने सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला आणि आम्ही फार काही करु शकलो नाही,” असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सकाळच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह
गृहमंत्री अमित शाहांना अर्ध्या रात्री फोन करुन काहीही सांगता येतं. ती गोष्ट तेवढं सिरीअस घेऊन ते करतात. अजित पवारांसोबतच्या शपथविधीचे शिल्पकारही अमित शाहचं होते. त्यांनी स्वत: लक्ष घालून शपथविधी झाला पाहिजे किंवा इतर सर्व गोष्टी त्यांनी लक्ष घालून केल्या, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar Reveal BJP-NCP Alliance)
संबंधित बातम्या :
आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस