मुंबई : “कुणीही चांगलं काम केलं तर त्या कामाचं कौतुक केलं पाहिजे (Devendra Fadnavis on Sanjay Raut criticism on Sonu Sood). अभिनेते सोनू सूद यांनी चांगलं काम केल्यानंतर ते भाजपचे आहेत, असं सांगितलं, त्याचा आम्हाला आनंद आहे. चांगलं काम करणारे भाजपमध्येच आहेत, हा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Sanjay Raut criticism on Sonu Sood).
अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर ‘सामना’तून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले. अखेर रविवारी (7 जून) रात्री सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सोनू सूदवर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून सांगतो, त्यांनी स्वत:च्या भरोश्यावर आणि हिंमतीवर समाजात कार्य केलं. या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे. आम्ही ज्यावेळी जलयुक्त शिवारचं कार्य करायचो, त्यावेळी नाम फाऊंडेशन, अभिनेता आमीर खानचं फाऊंडेशन काम करायचं. आम्ही त्यांचा हेवादावा कधी केला नाही. उलट त्यांना अधिक मदत कशी करता येईल, याचा विचार केला. कारण सरकारच्या कामात ते मदत करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक केलं”, असं फडणवीस म्हणाले.
“बीजीएस सारख्या संस्थेने चांगलं काम केलं. आम्ही त्यांचा हेवादावा नाही केला. उलट त्यांना अधिक मदत केली आणि त्यांची मदत घेतली. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणं चुकीचं आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना आपापल्या घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावरुन भाजप-मनसेसह काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही टीकेचे बाण सोडले होते. यानंतर सोनू सूद काल (रविवार 7 जून) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’वर गेला होता. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांची चर्चा झाली.
या भेटीचा फोटो ट्विट करत “एका चांगल्या व्यक्तीला भेटलो” अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले. तर संजय राऊत यांनी अखेर सोनू सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला..मातोश्रीवर पोहोचले, असे ट्विट करत त्यांना टोला लगावला.
रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलं?
“एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? “कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल” असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.” अशी टीका ‘सामना’तून झाली. (Sandeep Deshpande on Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok)
संबंधित बातम्या :
‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट
राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडे