रमेश शर्मा, टीव्ही9 प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (andheri assembly by poll) उमेदवार देऊ नका. रमेश लटके हे चांगले शिवसैनिक होते. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या विजयी होतील असं पाहा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना पत्रं लिहून केलं आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे यांचं म्हणणं रास्तच आहे. पण आता उमेदवार जाहीर झाला आहे. आमच्या पक्षात मी एकटा निर्णय घेत नाही. आमच्या पक्षाशी या संदर्भात बोलतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी मला पत्रं पाठवलं आहे. पण भाजपमध्ये मी एकटाच निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आम्ही उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली. त्यावेळी आम्ही उमेदवार दिला नव्हता. आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेत नाही असं नाही, असं फडणवीस म्हणाले.
आर आर पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला नव्हता. परंतु, आता शेवटच्या स्टेजला काही भूमिका घ्यायची असेल तर मला एकट्याला निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी पक्षात चर्चा करावी लागणार आहे. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. जरूर आम्ही या पत्राचा सीरियसली विचार करू. मात्र निर्णय जो घ्यायचा आहे तो चर्चे अंती घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी आज आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. पण अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं राज यांनी आशिष शेलार यांना सांगितलं. तरीही आम्ही या निवडणुकीत उमेदवार न देण्याची विनंती राज ठाकरे यांना केली होती, असं त्यांनी सांगितलं.
दैनिक सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यावर भाष्य करणं फडणवीस यांनी टाळलं. सामनावर मी बोलत नाही. मी सामनावर बोलून आपली उंची कमी करणार नाही. तुम्हीही एखाद्या छोट्या पेपरमध्ये बातमी आल्यावर मला त्यावर प्रतिक्रिया विचारत जाऊ नका, असंही ते म्हणाले.