पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 असे एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह विरोधकांनी शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. तसंच संजय राठोड यांच्यावरील गंभीर आरोप आणि अब्दुल सत्तार यांच्याबाबत कालच समोर आलेला टीईटी परीक्षेचा प्रकार, यावरुनही विरोधक शिंदे आणि फडणवीसांना प्रश्न विचारत आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलंय.
फडणवीस म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार होत नाही, हे सरकार पडेल असंही काही लोक बोलत होते. आता विस्तार झाला, सरकारही मजबूत आहे. काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही. तसंच महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केलाय.
इतकंच नाही तर ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरु असतील, अशा पक्षाने अशाप्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी राष्ट्रवादीला विचारलाय. पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहावा आणि नंतर त्यांनी अशा प्रकारची टीका करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय. संजय राठोड यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असं सांगत फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.
आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका करत थेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. “स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका आदिवासी समाजामधून सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संविधानिक पदाची शपथ घेतात, तेव्हा महिला भगिनींना निश्चितच अभिमान वाटतो. पण दुसरीकडे आज मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये निश्चितपणाने स्थान दिले गेले पाहिजे आणि याचा विचार या मंत्रिमंडळामध्ये प्राधान्य क्रमाने विचार करणे फार गरजेचे आहे, अशी अपेक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलीय.