पुणे: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपलाच विजय होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ते कळून चुकलं आहे. त्यामुळे पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून ते कव्हर फायरिंग करत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)
पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं आहे. पदवीधर मतदारसंघाची नोंदणी चांगली झाली आहे. आपण आर्धी लढाई जिंकलो आहोत. त्यामुळेच जयंत पाटलांनी कव्हर फायरिंग सुरू केली आहे. जयंत पाटील अत्यंत हुशार नेते आहेत. समोर पराभव दिसू लागल्यावर त्यांनी लगेच कव्हर फायरिंग सुरू केली आहे. पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिसही त्यांनी सुरू केली असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.
यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी बोगस मतदान होणार असल्याच्या विरोधकांच्या टीकेचाही समाचार घेतला. बिहारमध्ये आपण जिंकायला लागलो तर यांना मंगळ ग्रह आठवतो आणि ते हरायला लागले की ईव्हीएम आठवते, असा टोला त्यांनी लगावला. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन नाहीत. त्यामुळे बोगस मतदान होणार असल्याची बोंब मारायला त्यांनी सुरुवात केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
या सरकारच्या काळात प्रत्येकाला त्रास दिला जात आहे. या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. आम्ही सरकारमध्ये होतो. आमच्याविरोधातही सोशल मीडियावरून लिहिलं गेलं. पण आम्ही कुणाला त्रास दिला नाही. कुणाला तुरुंगात टाकलं नाही, असं सांगतानाच आता सविनय कायदेभंग करण्याची वेळ आली आहे. तुम्ही तयार राहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. अंगावर कितीही केसेस पडल्या तरी चालेल. घाबरू नका. ज्यांना घर नाही, दार नाही. संसार नाही. असा मोदींसारखा नेता आपल्या पाठिशी आहे, त्यामुळे घाबरू नका, असंही ते म्हणाले.
VIDEO : पुणे पदवीधर मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा झंझावाती प्रचार, देवेंद्र फडणवीस LIVE#Pune @PawarSpeaks @Dev_Fadnavis pic.twitter.com/YoA2O4UjXu
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2020
(devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)