मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस बळाच्या जोरावर भाजप कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. पोलिसी बळावर भाजपला दाबू असं या सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही अशा खूप लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. भाजपचा डीएनए संघर्षाचा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असं सांगतानाच जे इंदिराजींना जमलं नाही ते यांना काय जमणार?, अशा शब्दात भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला ललकारले. (devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)
भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला करतानाच मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. ठाकरे सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पुढच्या काळात पोलीस तंत्राचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांना अटक केली जाणार आहे. आम्ही त्याची चिंता करत नाही. आमचा डीएनए संघर्षातून तयार झालेला आहे. आम्ही खूप लाठ्याकाठ्या खाल्ल्या. तुरुंगात गेलो. आम्ही त्याची पर्वा करत नाही. लाठ्याकाठ्या खाणं हा आमचा रोजचाच धंदा आहे, असं सांगतानाच पोलिसी बळावर विरोधी पक्षाला दाबू असं सरकारला वाटतं असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. आम्हाला तुम्ही दाबू शकत नाही. कार्यकर्त्यांनों तयार राहा. ते तुम्हाला पुढच्या काळता त्रास देतील. तुम्ही घाबरू नका. जे इंदिराजींना जमलं नाही, ते यांना काय जमणार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यावेळी त्यांनी पोलिसांनाही नियमाने वागण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी कायद्यानं वागावं ही त्यांना विनंती आहे. सरकारं येतात आणि जातात. हे लक्षात ठेवा आणि नियमाने वागा. कुणावरही विनाकारण कारवाई करू नका. जे नियमात असेल तेच करा. आम्ही चुकत असेल तर जरूर कारवाई करा. घाबरू नका. पण नियमांच्या बाहेर जाऊ नका, असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला.
या सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्याविरोधात आणि माझ्या पत्नीविरोधात ट्विट करण्यात आले. पण म्हणून आम्ही कुणाला जेलमध्ये टाकलं नाही, असं सांगतानाच पत्रकार अर्णव गोस्वामी यांना फसवण्याचा प्रयत्न झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला चपराक दिली. माझ्याविरोधातही गोस्वामी बोलले होते. शो ही केले होते. पण त्यांना मी तुरुंगात टाकलं नाही, असं ते म्हणाले. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना त्यावर बोलणारे पत्रकार आणि संपादक कुठे आहेत? आता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसत नाही का? या सरकारलाही टॉलरन्स म्हणजे काय ते शिकवा ना? की सरकार बदलताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्याही बदलते, असा सवाल करतानाच या देशातील तथाकथित उदारमतवादी लोक दुटप्पी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)
राज्यातील जनता भाजपसोबत : देवेंद्र फडणवीस https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/FSRhEB6Glw
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2020
संबंधित बातम्या:
इच्छा तिथे मार्ग, टाईमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग; फडणवीसांचा घणाघात
“ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस
देशातील लोकांना ‘कर्मयोग’ आवडतो, ‘बोलघेवडेपणा’ नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
(devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)