मुंबई: भाजप (bjp) एक टीम आहे. अनेक नेत्यांनी भाषणात माझा उल्लेख केला. मला अमिताभ बच्चन म्हटलं. माझं शरीर अमजद खान सारखं आहे. पण हे मला अमिताभ बच्चन म्हणत आहेत. (कितने आदमी थे, मागून आवाज) हे विचारू शकतो. कितने आदमी थे? 65 मे से 50 निकल गये. और सबकुछ बदल गया. अभी दोही बचे है. त्यांचाही सन्मान आहे, असा हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (shivsena) चढवला आहे. आम्ही विरोधकांना सन्मान देतो. मला जो सन्मान मिळाला तो भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे. तुम्ही मेहनत केली. तुम्ही मला नेता बनवलं. त्या यशाचा मान मला मिळाला. तुम्ही मेहनत केली नसती तर देवेंद्र फडणवीस या नावाला काही किंमत उरली नसती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी शिवसेनेला फटकारे लगावले.
आता आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे. तारीख पे तारीख नाही. मुंबईच्या समस्यांचे आरोपी कोण हे जनतेला विचारायचं आणि जनतेला सांगायचं न्यायाधीश तुम्ही आहात. आरोपी हे आहेत. आता न्याय मुंबईकरता करा. मुंबईकर जेव्हा आपल्यासाठी न्याय करतील तेव्हा मुंबईत सत्ता पालट झालेलं असेल. जनतेच्या मनातून फायनल जजमेंट येईल. याचा मला विश्वास आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचाराच्या विळख्यातून महापालिकेला बाहेर काढावं लागेल. काही लोकांना महाराष्ट्र गेल्याचं दु:ख नाही. त्यांना मुंबई महापालिकेचं दु:ख आहे. महापालिका मुठभर लोकांच्या हातात ठेवायची नाहीये. घराण्याची ठेवायची नाही. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे. काही लोक आत्ममग्न होते. त्यांनी आम मुंबईकरांकडे लक्ष दिलं नाही. बाळासाहेबांचं नाव घेऊन निवडून आलेल्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे आपल्याला मेहनत करून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.