महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. 18 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रचार संपेल. त्याआधी सर्वच पक्ष आणि नेते मंडळी राजकीय सभा, मुलाखतीच्या माध्यमातून जोरदार प्रचार करतायत. भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हवेची दिशा बदलली आहे. मागच्या सहा महिन्यात आम्ही ज्या पद्धतीने काम केलं, त्यामुळे लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे” एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. “लोकसभा निवडणूक जून महिन्यात झाली, आता नोव्हेंबर चालू आहे. या काळात काय बदललं? या प्रश्नाच उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हवेची दिशा बदलली आहे. महाविकास आघाडीने त्यावेळी फेक नरेटिवद्वारे विचार प्रदूषित केले. आम्ही आता ते खोडून काढलय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीत आमचा दोन कारणांमुळे पराभव झाला. एक म्हणजे संविधान बदलणार आणि दुसरं म्हणजे आरक्षण काढणार. हा प्रचार तळागाळात झाला. ही मी माझी चूक मानतो. ज्या वेगाने हे नरेटिव पसरलं, ते आम्ही रोखू शकलो नाही. त्यामुळे मतदारांचा एक मोठा वर्ग लांब गेला. काँग्रेसने महाराष्ट्रात व्होट जिहादचा प्रयोग केला. काही जागा आम्ही अल्पसंख्यांक मतांमुळे गमावल्या” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “काही जागांवर धार्मिक नेत्यांनी प्रचार केला, धर्मस्थळावरुन अपील करण्यात आलं. एक प्रकारे व्होट जिहाद इथे करण्यात आला. आता दोन्ही गोष्टी इथे यशस्वी होणार नाहीत. आता लोकांनाही कळल मोदीजी आरक्षण देणारे आहेत, घेणारे नाही. लोकांना आता हे लक्षात आलय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बंटेंगे तो कटेंगे एकदम योग्य
व्होट जिहाद आणि योगीजींच्या बंटेंगे तो कटेंगे नाऱ्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात आम्हीच जिंकणार. आपलं काम आणि योजनांच्या आधारावर मोदींजीनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला मदत केलीय, त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही जिंकणार” “समोरुन जेव्हा समाजाची विभागणी होतेय, हे पाहिल्यावर योगी जी म्हणाले बंटेंगे तो कटेंगे. हा, तर भारताचा इतिहास आहे. भारत जेव्हा कधी, जात, प्रांत आणि भाषेच्या आधारावर विभागला गेलाय. त्यावेळी गुलामी करावी लागली आहे. त्यामुळे बंटेंगे तो कटेंगे एकदम योग्य आहे. पण त्यापेक्षाही मोदींनी जो मंत्र दिलाय, एक हैं तो सेफ है हा खूप महत्त्वाचा आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘मग, तुम्ही अजित पवारांना ही गोष्ट का पटवून देत नाही?’
बंटेंगे तो कटेंगे हीच गोष्ट तुम्हाला अजित पवार, अशोक चव्हाण आणि पंकजा मुंडे यांना का समजावता येत नाहीय?. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अजित पवार, अशोक चव्हाण वेगळ्या विचारधारेतून आले आहेत. ते सूडो सेकुलरिज्म त्यांच्या विचारातून बाहेर येतं. योगीजी जेव्हा बोलतायत, बंटेंगे तो कटेंगे याचा अर्थ त्यांना समजत नाहीय. पण आम्ही लवकरच ती गोष्ट त्यांना पटवून देऊ”
‘या मुद्यावर 100 टक्के मतभेद’
अजित पवार नवाब मलिक आणि सना मलिक यांना तिकीट देतात, तेच जीशान सिद्दीकी पीएम मोदींच्या रॅलीपासून लांब रहातात, अजित पवारांसोबत मतभेद आहेत का? त्यावर फडणवीस म्हणाले की, “काही मतभेद नाहीयत. पीएम मोदींच्या सभांची आम्ही वाटणी केली होती. पहिल्या सभेत मी होतो. मग सीएम होते. त्यानंतर एका सभेत अजित पवार होते. एका सभेला तटकरे गेले. वेगवेगळ्या सभांना वेगवेगळे लोक जाणार हे आम्ही आधीच ठरवलेलं” “हो, नवाब मलिक यांचं काम आम्ही करणार नाही, या मुद्यावर 100 टक्के मतभेद आहेत. नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका असं आम्ही सांगितलं होतं, तिथे आम्ही शिवसेनेला तिकीट दिलय, त्यांचं काम आम्ही करतोय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.