मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या भाषणात गेल्या काही महिन्यांपासून फरक पडला आहे. पूर्वी फडणवीस भाषण करताना वरच्या पट्टीत बोलायचे. श्वास न घेता पल्लेदार वक्तव्य करायचे. आता मात्र, त्यात फरक पडलेला दिसत आहे. फडणवीसांमध्ये हा बदल अचानक कसा झाला? याचं अनेकांना कुतुहूल वाटत आहे. फडणवीस यांच्यात झालेला हा बदल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांच्यामुळे झाला असं सांगितलं तर? आश्चर्य वाटेल ना? पण ते खरं आहे. नाना पाटेकर यांनी सातत्याने टोचल्यामुळे फडणवीस यांच्या वक्तृत्वात बदल घडून आला आहे. तशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी फडणवीस आणि नाना पाटेकर या दोघांनीही हा किस्सा सांगितला. तुम्ही मुख्यमंत्री झाला. भाषण करताना तुमचा स्वर फार वरचा लागायचा. ते करू नका, असं नाना पाटेकर फडणवीस यांना सांगायचे. त्यानुसार फडणवीस दुरुस्तीही करायचे.
माझा स्वर खालच्या पट्टीत आला. नाना त्याचं क्रेडिट तुम्हाला जातं. विधानसभा निवडणुकीतील प्रत्येक भाषणा नंतर नानांचा फोन यायचा. अरे बाबा किती जोराने बोलतो. जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबुल करायचो की तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका, बदल जाणवेल. पण पुढच्या भाषणात मी तसंच बोलायचो. पुन्हा नानांचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं. त्याचं शंभर टक्के क्रेडिट नानांचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी हे उत्तर देताच नाना पाटेकर यांनी त्यावर कोटी केली. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजितदादांना आहे. गाण्यात लतादीदी आणि बोलण्यात अजितदादा हे कुठे श्वास घेतात हे कळतही नाही. पण तुम्ही पूर्णपणे स्वत:ला बदलून टाकलं आहे, असं नाना म्हणाले.
गेल्या 9 महिन्यात 1 हजार 92 आत्महत्या झाल्या आहेत. त्यावर काय उपाययोजना कराल, असा सवाल नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. त्यावर शिंदे यांनी उत्तर दिलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायलाच नको, त्यासाठी मोठ्या योजना आणल्या. कालच्या कॅबिनेटमध्ये 11 हजार कोटीच्या योजनेला मंजुरी दिली. जवळपास 2 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समुद्राकडे वाहून जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचा प्रयत्न आहे, असं शिंदे म्हणाले.
शेतीला पूरक धंदा देण्यावर आमचा भर आहे. अधिकारी काम करत आहेत. शेतकऱ्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करत आहोत. मराठावाडा, विदर्भातील आत्महत्या होऊच नये. एक एक जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. जमीन ओलिताखाली आणणं याला आम्ही महत्त्व दिलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
तर, जिथे सिंचन आहे. तिथे आत्महत्या नाही. जिथे सिंचन नाही, तिथेच आत्महत्या आहे. जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर जमीन रब्बीखाली आली. त्यामुळे त्याला दोन पिकं घेता येतं. रब्बीचं क्षेत्र 39 लाख हेक्टरने वाढलं.
विदर्भातील वाहून जाणारं पाणी बुलढाण्यापर्यंत आणलं तर बराच फायदा होईल. जो शेतकरी त्याची जमीन भाड्याने देईल. त्याला 60 ते 70 हजार पर्यंत भाडं देऊ. 30 वर्ष जमीन भाड्याने घेऊ. सोलर लावू. त्यामुळे त्याला वीज मिळेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.