काहीतरी मोठं घडतंय? नाराजी नाट्यानंतर अजित पवारांचा अचानक दिल्ली दौरा, आता देवेंद्र फडणवीस भेटीला

| Updated on: Jul 24, 2024 | 6:29 PM

महायुतीत पडद्यामागे जोरदार घडामोडी सुरु आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत अजित पवार यांच्यासोबत काही मंत्र्यांची खडाजंगी झाली. यानंतर अजित पवार काल रात्री अचानक दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीला गेले. यानंतर आता देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

काहीतरी मोठं घडतंय? नाराजी नाट्यानंतर अजित पवारांचा अचानक दिल्ली दौरा, आता देवेंद्र फडणवीस भेटीला
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

महायुतीमध्ये सध्या धुसफूस असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीच्याआधी महायुतीत धुसफूस असणे हे त्यांच्याशी फायदेशीर नाही. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करणं हे भाजपसाठी जास्त महत्त्वाचं असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर भाजपकडून अप्रत्यक्षपणे निशाणा साधला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारदेखील आता भाजपच्या मंत्र्यांवर उघडपणे निशाणा साधताना दिसत आहेत. असं असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री अजित पवार यांच्यासोबत काही मंत्र्यांची शा‍ब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. या बैठकीवरुन दोन्ही बाजू्च्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीनंतर अजित पवार काल रात्री अचानक तडकाफडकी दिल्लीला गेले. तिथे जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अमित शाह यांच्या भेटीत निधी वाटपावरुन जो वाद झाला त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी 10 दिवसांपूर्वीदेखील अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी पुन्हा अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी काल अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते परत मुंबईत परतले आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर गेले आहेत. तिथे दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

निधी वाटपावरुन नाराजी की महायुतीत धुसफूस?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाच्या काही नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील भाजपच्या चार मंत्र्यांची नावे घेत निशाणा साधला होता. यानंतर निधीवाटपावरुन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार आणि अमित शाह यांच्यातील भेट ही निधी वाटपाच्या नाराजी नाट्यावर असल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, दुसरी चर्चा अशीदेखील आहे की, विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. महायुतीच्या तीनही पक्षांकडून जागावाटपाबाबत वेगवेगळा दावा केला जातोय. त्यामुळे जागावाटपावर चर्चा करण्यासाठी अमित शाह आणि अजित पवार यांच्यात काल भेट झाली. यानंतर देवेंद्र फडणवीस आज अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. पण जागावाटपावर चर्चा करायची असेल तर महायुतीत तीन पक्ष आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षदेखील महायुतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचा एखादा प्रमुख नेता असणे अपेक्षित आहे. पण तसं काही होताना दिसलेलं नाही. त्यामुळे महायुतीत पडद्यामागे काय घडतंय? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.