बीड : बीड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेच आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगीही देण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेंच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सभेची परवानगी नाकारल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरम्यान भाजपच्या सभेला परवानगी देण्यात आली असल्याने निवडणूक आयोगाकडे यासाठी दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून बीड मध्ये राजकीय हालचालीला वेग आले आहे. भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वास असलेले बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीची जाहीर सभा आयोजित केली होती. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार होती. मात्र ऐनवेळी पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाने राष्ट्रवादीच्या सभेची परवानगी नाकारून पंकजा मुंडेंच्या सभेला परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
“भाजपची सत्ता आल्यापासून बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन मस्तीत आले आहे. हवे तसे कायदे केले जात आहेत. आम्हाला नाहक त्रास देण्याचा पोलिसांनी विडा उचलला आहे. त्यामुळे निवडणूक मतदान काळात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला त्रास होण्याची दाट शक्यता आहे, म्हणूनच याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहे.” असे धनंजय मुंडे यांनी सांगितले