धारावीत आज मशिदीच अनधिकृत बांधकाम तोडण्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला होता. धारावीच्या 90 फीट रोडवर एक मशिद आहे. या मशिदीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप आहे. आज सकाळी मुंबई महापालिकेच पथक हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी धारावीत पोहोचलं. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी मुंबई महापालिकेची गाडी फोडण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जातेय असं लक्षात येताच पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त धारावीमध्ये लावण्यात आला होता. खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या संबंधी धारावी पोलीस स्टेशनमध्ये एक बैठक झाली. त्याला सर्वपक्षीय नेते, आंदोलक उपस्थित होते. या बैठकीत निघालेल्या तोडग्यानुसार पालिकेकडून आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान कोणतीही कारवाई होणार नाही.
हा विषय तापल्यानंतर त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. सातत्याने हिंदुत्वाच्या विषयावर बोलणारे भाजपाचे कोकणचे आमदार आणि नेते नितेश राणे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया दिली. “मी वारंवार बोलतोय. या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशात, महाराष्ट्रात शरीया कायदा लागू करायचा आहे” असा आरोप त्यांनी केला.
नितेश राणेंच प्रक्षोभक वक्तव्य
“एकाबाजूला संविधान बचाव आणि कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो हे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ते तोडण्यासाठी टीम आली. त्यावेळी तिथल्या जिहाद्यांनी अतिक्रमण तोडू दिलं नाही पालिकेच्या गाड्या फोडल्या. ही जी काय अरेरावी, दादागिरी आहे, ती त्यांच्या पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन दाखवावी” असं प्रक्षोभक वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
धारावीतल्या एका नागरिकाच मत काय?
“धारावीत पूनर्वसन प्रकल्प सुरु आहे. धारवीचं सगळं कंस्ट्रक्शन तुटणार आहे. त्यामुळे अनधिकृतच्या नावाखाली प्रार्थनास्थळावर कारवाई करत असाल, एक धारावीकर म्हणून शातं बसणार नाही. सगळे निषेध करण्यासाठी जमले आहेत. शांतता हवी आहे की, कायदा-सुव्यवस्था बिघडवायची आहे? याची पूर्ण जबाबदारी पालिकेची आहे. एका धारवीकर म्हणून ही कारवाई होऊ देणार नाही” असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.