मुंबई: जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे ठाकरे सरकारमधील तरुण मंत्री आहेत. अत्यंत शांत आणि साधी राहणीमान असलेले मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. गडाख यांच्या घरातच राजकीय वारसा होता. त्यामुळे त्यांना राजकारणात उभं राहणं सोपं झालं. मात्र, त्यापलिकडेही त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. ‘पाणीदार आमदार’ म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. शंकरराव गडाख यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश… (did you know about panidar amdar Shankarrao Gadakh?)
थोडक्यात…
शंकरराव गडाख हे अहमदनगरचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत. 29 मे 1970मध्ये जन्मलेले शंकरराव हे बीकॉम झालेले आहेत. 2019मध्ये ते नेवासा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी 2009 मध्येही ते विजयी झाले होते. सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत. शंकरराव गडाख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात.
साखर कारखान्याचे चेअरमन
शंकरराव गडाख यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा सहकार चळवळीतून झाला. 1994 ते 2005मध्ये मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले. इथूनच त्यांच्या राजकारणास सुरुवात झाली. त्यांच्या काळात या साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कारही मिळाला होता. याच कालात त्यांनी 30 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्पही सुरू केला होता. तर 2007 ते 2008 या कालावधीत नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी शेती, शिक्षण आणि महिला बचत गटांसाठी मोठं काम केलं. त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने युवक काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली.
शंकरराव गडाख बंधारा पॅटर्न
शंकरराव गडाख यांना खरी ओळख मिळाली ती शंकरराव गडाख बंधारा पॅटर्नमुळे. 2013मध्ये दुष्काळ असताना त्यांनी 155 साठवण बंधारे, 145 साखळी बंधारे, 23 गावतळे आणि 17 पाझर तलावांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम त्यांनी केले. या कामावर त्यांनी जातीने लक्ष दिलं. जागेवर उभं राहून त्यांनी हे काम करून घेतलं. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील पाण्याचा दुष्काळच संपून गेला. त्यामुळेच त्यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखलं जातं. या पॅटर्नने केवळ जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.
शेतकऱ्यांच्या दूधाला भाव दिला
शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला भाव मिळावा म्हणून 2000मध्ये त्यांनी थेट नेवासा तालुका सहकारी दूध संघाची स्थापना केली. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दूधाला योग्य भाव देण्याचं काम त्यांनी केलं.
पराभवातून नवनिर्मिती
शंकरराव गडाख यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव लागला होता. मात्र, या पराभवामुळे ते खचले नाहीत. उलट त्यांनी अधिक मोर्चेबांधणी सुरू केली. या काळात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पाण्याच्या प्रश्नावर आंदोलने छेडली. तुरुंगातही गेले. नेवासा तालक्यातील शेतकऱ्यांच्या पाटपाणी व वीजेच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने केली. त्यानंतर त्यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले. या निवडणुकीत 7 पैकी 5 आणि पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागा जिंकल्या. नेवासामध्ये त्यांनी 9 नगरसेवकही निवडून आणले आहेत. गडाख यांच्या या विजयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलली. राज्यभर भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतानाच नेवासा तालुक्यात मात्र गडाख यांच्या पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला घरघर लागलीहोती.
अपक्ष आमदार म्हणून विजयी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलन, पाणी प्रश्नावर आंदोलन करतानाच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेलं काम, महिला बचत गटाचं जाळं… नव्या पक्षाची बांधणी या बळावर गडाख यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. अपक्ष निवडणूक लढवूनही त्यांनी 30 हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.
‘भोळ्या शंकरा’
2019च्या विधानसभा निडवणुकीत अपक्ष लढत असताना शंकरराव गडाख यांनी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला होता. भाजपचा उमेदवार समोर असल्याने गडाख यांनी सोशल मीडियावरून प्रचारावरही भर दिला होता. त्यावेळी ‘भोळ्या शंकरा’ हे भक्तिगीत मोठ्या प्रमाणावर गाजत होते. गडाख यांचं नावही शंकर असल्याने या गाण्याचा त्यांनी खुबीने वापर केला होता. त्यांच्या प्रचारात, मोबाईल रिंग टोनमध्ये या गाण्याचा वापर करण्यात येत होता. गडाख यांच्या या सोशल मीडिया वॉरमुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच घायाळ झाले होते.
नगरमध्ये ताकद वाढली
शंकरराव गडाख यांनी ऑगस्ट 2020मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी हातात शिवबंधन बांधून घेतलं. त्यांच्या प्रवेशामुळे नगरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. माजी आमदार अनिल राठोड यांच्या मृत्यूनंतर नगरमधील शिवसेनेचा चेहरा हरपला होता. मात्र, गडाख यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ही उणीव भरून निघाली आहे. (did you know about panidar amdar Shankarrao Gadakh?)
शंकरराव गडाख कोण आहेत?
>> शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत.
>> ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आमदार आहेत.
>> त्यांनी शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
>> मोठ्या मताधिक्यांनं विजयी झाल्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेदरम्यान शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
>> सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत.
>> शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या जवळचे मानले जातात. (did you know about panidar amdar Shankarrao Gadakh?)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 30 March 2021https://t.co/SDhImUuuES
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
संबंधित बातम्या:
पवारांचे खंदे समर्थक, कागलकरांच्या मनातला ‘हिंदकेसरी’; जाणून घ्या, कोण आहेत हसन मुश्रीफ?
वनवासातून पुन्हा सत्तेत, असं आहे अशोक चव्हाणांचं ‘राज’कारण!
रश्मी शुक्लांचा दबाव झुगारला; कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?
(did you know about panidar amdar Shankarrao Gadakh?)