अक्षय आढाव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना सभागृहांमध्ये करमणूक करवाढ विधेयकावर चर्चा सुरु झाली होती… त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते… करमणूक करवाढ विधेयक आणू नये म्हणून या विधेयकाच्या विरोधात विरोधी पक्ष सदस्यांची भाषणे सुरु होती… भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या विषयावर बोलत होते… हे विधेयक कलावंतांवर अन्याय करणारं आहे, त्यामुळे हे विधेयक मंजूर करु नये… महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी आहे, त्यामुळे करमणूक करामध्ये वाढ करणे यथोचित नाही, असं खडसे म्हणत होते…
विविध दाखले देऊन खडसेसाहेब करमणूक करवाढ विधेयकाला प्रखर विरोध करत होते… तेवढ्यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताडकन उभे राहिले आणि सभागृह अध्यक्षांना उद्देशून म्हणाले की, “मला दोन मिनिटे बोलायचे आहे…” अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य केली.. मुख्यमंत्री म्हणाले की, करवाढ विधेयकावर खडसे साहेब बोलत आहेत ते ठीक आहे, पण त्यांना थांबविण्यात यावे… कारण या विधेयकावर उत्कृष्ट अशी मांडणी दिलीप सोपल साहेब करु शकतात… म्हणून त्यांनी या बिलावर बोलावे, असं म्हणून त्यांनी दिलीप सोपल यांचं नाव सुचवलं…
तेव्हा सोपल पाठीमागच्या बाकावर बसलेले होते… त्यांना या बिलासंदर्भात काहीही कल्पना नव्हती… मुख्यमंत्री विलासरावांनी दिलीप सोपल यांची फिरकी घेण्यासाठी मिश्कीलपणे त्यांचं नाव सुचवलं होतं… मग काय अध्यक्षांनी वरुन आदेश दिला की खडसे साहेब तुम्ही खाली बसा… आता या बिलावर दिलीप सोपल बोलतील… आता दिलीप सोपल यांनी या करमणूक करवाढ विधेयकाचं काहीही वाचन केलं नव्हतं… त्यांनी या विषयावर बोलण्यासाठी आपलं नावही दिलं नव्हतं. कारण एखाद्या विधेयकावर बोलायचं असेल तर सदस्यांना अगोदरच आपलं नाव द्यावं लागतं… परंतु सभागृहाच्या नेत्याने सोपलांनी या विषयावर बोलावं अशी मागणी केल्यामुळे सोपलांना बोलणं भाग होते…
मग ते बिल कुठं आहे? हे ते शोधायला लागले… तिथल्या शिपायाने ते बिल त्यांच्याकडे आणून दिलं… करमणूक करवाढ विधेयक बिल दिलीप सोपल यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात या वाक्याने केली की, “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तशी कलावंतांचीही भूमी आहे… टाळ आणि चाळ यांचं एक अतूट नातं आहे… टाळ किती महत्त्वाचा आहे आणि चाळसुद्धा किती महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी अतिशय उस्फूर्तपणे प्रभावी असं भाषण केलं…
दिलीप सोपल म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सध्या आघाडीचे शासन आहे… टाळाचं खातं आर आर पाटलांकडे आहे तर चाळाचं खातं हे मुख्यमंत्री विलासरावांकडे आहे… त्यामुळे पंढरीची वारी आबा करतात आणि लावणी महोत्सव आणि तमासगीर यांच्या संदर्भातील काम विलासराव करतात… याच्यावर सोपल यांनी जे किस्से सांगितले ते ऐकून सभागृह मंत्रमुग्ध होऊन गेले…
त्यानंतर सोपल यांनी बिलावर भाष्य करताना कलाकारांच्या व्यथा मांडल्या… त्यात दशावतार असेल, भारुडकार असेल… लावणी असेल… लोकनाट्य असेल… नाटक असेल… तमाशा असेल… या सगळ्या महाराष्ट्राच्या गाजलेल्या कला आहेत आणि तुम्ही जो कर वाढवणार आहात त्याचा फटका कलाकारांच्या पोटावरती बसणार आहे, असं सोपल म्हणाले… सोपल यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री उत्तर देण्यासाठी उभे राहिले… त्यांनीही तेवढ्याच मिश्कीलपणे सोपलांच्या प्रश्नांना उत्तरं दिली… ही सभागृहातील जुगलबंदी अप्रतिम स्वरुपाची होती… त्या जुगलबंदीतून, किश्श्यातून हास्यातून, एकमेकांना चिमटे काढण्यायातून सभागृहातील वातावरण तणाव मुक्त झाले… शेवटी सभागृहाचा नेता या नात्याने हर्षवर्धन पाटील यांनी करमणूक करवाढीचे विधेयक माघार घेत असल्याचे घोषित केलं….!
(Dilip Sopal Speech In Maharashtra Vidhansabha Over Entertainment tax hike Bill)
हे ही वाचा :
Special Story : जेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचविले…!