मुंबई: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
दिपाली सय्यद यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गट सोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मी येत्या शनिवारी शिंदे गटात सहभागी होणार आहे. येत्या तीन दिवसांवर माझा प्रवेश आहे. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.
मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या पाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतून मी शिंदे गटात येत आहे, असं त्या म्हणाल्या.
एकनाथ शिंदे जी जबाबदारी मला देतील ती मी स्विकारेन. मला ते काय जबाबदारी देणार आहेत, याची मला पुरती कल्पना आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी तयार आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या बंडाची पाठराखणही केली. शिंदे गटाने केली ती गद्दारी नाही. तो त्यांचा हक्क आहे. त्यांनी आपला हक्क मागितला आणि त्यासाठी लढले. राजाच्या आजूबाजूच्या लोकांचेही अधिकार हक्क असतात. त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा, असंही त्या म्हणाल्या.
मोठ्या पातळीवर वाद जेव्हा होतो, तेव्हा त्याची कारणं जनतेला कळली पाहिजेत. सतत खोके खोके म्हटलं जातं. खोक्यांचं राजकारण काय आहे हे लोकांना कळंल पाहिजे. या खोक्यांचे मुख्यसूत्रधार कोण आहेत हे सुद्धा कळलं पाहिजे.
मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. कुठे काय होतंय आणि कोणत्या गोष्टी कुठपर्यंत जातात हे सुद्धा जनतेला कळलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.