मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. मात्र, या प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं वृत्त कालच दिलं होतं. त्यानंतर आता हे मतभेद पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत. कारण, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दोन सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. (Disagreement in Mahavikas Aghadi over ward system of Municipal Corporation)
मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेला काँग्रेसनं विरोध केलाय. आज काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या कार्यकारिणी बैठकीत आता सर्व महापालिकांसाठी 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
प्रभाग रचनेवरुन मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे चार सदस्यी प्रभाग रचनेच्या बाजूने होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचना हवी होती. हे नेते आपल्या मागणीवर अडून होते. मात्र शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यममार्ग काढत 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आगामी 18 पालिका निवडणुकीसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच विद्यमान सरकारनं कायद्यात बदल करत पुन्हा एक सदस्यीय वार्ड पद्धत आणली होती. अजित पवार यांनी पुढाकार घेत प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापालिका वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तिन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांच्या दबावापुढे अजित पवारांना माघार घ्यावी लागल्याचं बोललं जात आहे.
‘आपल्याला पद्धतीने, आपल्या सोयीने प्रभाग तयार करणे आणि त्यातून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्याचा त्रास लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायचं सोडून 3 – 3 उमेदवारांना मतदान का करायचं? म्हणजे सर्व जनतेला गृहित धरायचं, आपल्याला हवे त्या पद्धतीनं प्रभाग करायचे, खरं तर हे योग्यच नाही, कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे. इथं महाराष्ट्राचा कायदा वेगळा आणि देशाचा कायदा वेगळा असं काही आहे का? हे दोनचे प्रभाग, तीनचे प्रभाग, चारचे प्रभाग कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही तीन-तीन आमदार, तीन-तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? हे सगळं यांच्या फायद्यासाठी सुरु आहे’, असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय.
इतर बातम्या :
प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा घणाघात, आता लोकांनीच कोर्टात जाण्याचं आवाहन
काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातल्याची चर्चा! थोरात म्हणाले, काँग्रेसला विजयाचा विश्वास
Disagreement in Mahavikas Aghadi over ward system of Municipal Corporation