कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन डीके शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना थेटच सांगितलं

| Updated on: May 17, 2023 | 8:14 PM

कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गुरुवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन डीके शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना थेटच सांगितलं
Follow us on

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागून अनेक तास उलटले आहेत. कर्नाटकचा मुख्यमंत्री ( Karnataka CM ) कोण होणार याबाबत अजूनही कर्नाटकच्या जनतेला प्रश्न पडला आहे. कर्नाटकात राजकीय नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. डीके शिवकुमार आणि सिद्धरामया यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत हायकमांडला अद्याप निर्णय झालेला नाही. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही कर्नाटकातील दिग्गज नेते आहेत. दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी स्पष्ट नकार दिलाय. काँग्रेस हायकमांड कोणाला मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म देते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस सरकार स्थापन करताना आठ ते दहा मंत्र्यांना शपथ देण्याचा विचार करत आहे. काँग्रेस हायकमांडला आता कर्नाटकात एकच नेत्याकडे सगळी ताकद द्यायची नाही. या दोन्ही नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सध्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विचारविनिमय करत आहेत. येत्या ४८-७२ तासांत कर्नाटकात नवे मंत्रिमंडळ असेल.

डीके शिवकुमार यांची अट काय?

अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचीही चर्चा झाली. पण पहिले अडीज वर्ष आपल्याला हवे म्हणून रस्सीखेच सुरु आहे. डीके शिवकुमार यांची अट अशी आहे की, मला पहिली टर्म द्यावी अन्यथा मला काहीही नको. त्यामुळे पक्षश्रेष्ठीपुढे ही पेच निर्माण झाला आहे.

डीके शिवकुमार यांनी दिल्लीतील त्यांचे भाऊ आणि खासदार डीके सुरेश यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक आणि त्यांच्या गटातील आमदारांची भेट घेतली. डीके शिवकुमार मुख्यमंत्री होण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे.

सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण काँग्रेस हायकमांडने या नावावर सहमती दर्शवली नाही. ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचीही बातमी होती. मात्र, काही वेळाने रणदीप सुरजेवाला यांनी या केवळ चर्चा असल्याचं म्हटलं आहे.

डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. शिवकुमार यांनी खर्गे यांना सिद्धरामय्या यांचा मागील कार्यकाळ चांगला राहिला नसल्याचे सांगितले होते. लिंगायत समाजही त्याच्या विरोधात आहे. ते म्हणाले होते की, जर सिद्धरामय्या यांना आधीच मुख्यमंत्री बनवले आहे, तर आता इतर कुणाला संधी का मिळू नये.

13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला सत्तेतून खाली ओढले आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. अशा परिस्थितीत निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला.

आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. त्यानंतर ज्याला सुरुवातीला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही त्याची नाराजी कशी दूर केली जाते याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण नाराजी ही पक्षासाठी डोकेदुखी ठरु शकते.