Sharad Pawar Press Conference : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असे चित्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील नेत्यांकडून विविध विधानसभा निवडणुकीसाठीची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.
शरद पवारांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी सध्या घडणाऱ्या विविध राजकीय घटना, आरक्षण, छगन भुजबळांसोबत झालेली भेट आणि विधानपरिषदेतील पराभव याबद्दल त्यांचे मत मांडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलही एक मोठे वक्तव्य केले.
“आम्ही विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार आहोत. काही कार्यक्रम घेऊन जाणार आहोत. तो कार्यक्रम घेताना फार मोठा मॅनिफेस्टो ठेवावा असं वाटत नाही. नेमका आणि टू द पॉइंट अशा ठराविक गोष्टी घेऊन एकत्रित प्रयत्न करु. कालच्या निवडणुकीत जी कमतरता होती ती दुरुस्त करावी, हे सूत्र घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय”, असे शरद पवारांनी म्हटले.
“लोकांना बदल हवा आहे. तो बदल आमच्यादृष्टीने अनुकल झाला, तर काहीही झालं तर आम्ही पाच वर्ष सरकार उत्तम चालवू. त्यात नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही. मी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवणार नाही. चांगलं राज्य चाललं पाहिजे”, असे शरद पवारांनी म्हटले. यावेळी शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आपलं नाव नसल्याचे जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपची सर्व सुत्रे दिल्लीतूनच सुरू होती. पंतप्रधान देशात आक्रमकपणे हिंडत होते. महाराष्ट्रात त्यांच्या १७ ते १८ सभा झाल्या. त्यातील चार जागा सोडल्या तर इतर ठिकाणी आम्हाला यश आले. त्यामुळे त्यांनी विधानसभेत अधिक सभा घ्याव्या. महाराष्ट्राला अधिक मार्गदर्शन करावं. सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, निवडणुकीत कमी जास्त होतं. त्यातून सावरून उभं राहण्याचं काम सुरू होतं. त्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली असेल तर वाईट नाही. केंद्रीय गृहमंत्री त्यासाठी येत असतील तर त्यात आम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही, असा खोचक टोलाही शरद पवारांनी लगावला.