मुंबई : भाजपचे विद्यमान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर आता भाजपच्य महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोण, याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. रणजित पाटील यांच्या कामकाजावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह खुश आहेत. त्यामुळे रणजित पाटील महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची नावं चर्चे होती. मात्र, या सगळ्यांऐवजी रणजित पाटील यांचेच नाव सध्या आघाडीवर आले आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रणजित पाटील यांच्या नावाला केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेत्यांमध्ये पसंती आहे.
रणजित पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. उच्चशिक्षित आणि एकनिष्ठ भाजप नेते म्हणूनही रणजित पाटील यांची ओळख आहे.
रावसाहेब दानवे यांचा 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता पुन्हा दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.