नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election Result) मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यात थेट लढत आहे. सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आघाडीवर आहेत. खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. खासदारांच्या एकूण 748 मतांपैकी मुर्मू यांना 540 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना फक्त 208 मते मिळाली आहे. तर 15 खासदारांची मते बाद ठरली आहेत. रायसीना हिल्सच्या रेसमध्ये खासदारांची सर्वाधिक मते घेऊन द्रौपदी मुर्मू या आघाडीवर गेल्या आहेत. आता राज्यांमधील आमदारांची मतेही त्या खेचून घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, खासदारांचा कौल मुर्मू यांच्या बाजूने गेल्याने त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे.
सकाळी 11 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. आधी खासदारांची मते मोजण्यात आली. या पहिल्या फेरीत मुर्मू यांनी सर्वाधिक 540 मते घेतली आहेत. मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली आहेत. पहिल्या राऊंडमध्येच मुर्मू यांनी सर्वाधिक मते मिळवल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे मुर्मू यांच्या गावात प्रचंड जल्लोष करण्यात येत आहे.
आता संसदेच्या रुम नंबर 63 मध्ये आमदारांच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. लवकरच हा निकालही अपेक्षित आहे. मतमोजणी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्मू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी भाजपच्या कार्यालयात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित राहणार आहेत.
मुर्मू यांच्या विजयानंतर भाजप देशभर जल्लोष साजरा करणार आहे. दिल्लीत विजय रॅली काढली जाणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर रॅली काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. दिल्लीतील रॅलीचं नेतृत्व नड्डा करणार असून यावेळी ते भाषणही करणार आहेत. मात्र, या रॅलीत मुर्मू सहभागी होणार नाहीत. यावेळी 20 हजार लाडूंचं वाटप केलं जाणार आहेत.