गुवाहाटी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) गटासंदर्भात बोलताना भाजपचा (BJP) काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) बंडखोर शिवसेनेच्या आमदारांसोबत धावपळ का करत होते, त्यांच्यासोबत आमदार संजय़ कुटे का आहेत? या प्रश्नांची उत्तर मात्र भाजपानं दिलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा भाजपवर संशयाचं वातावरण निर्माण झालंय. तर दुसरीकडे हा भाजप-शिवसेना युतीचा तर डाव नाही ना, बंडखोर शिवसेना आमदार भाजपसोबत तर जाणार नाही ना, असे प्रश्न देखील सध्या चर्चेत आहे. दुसरीकडे माध्यमांशी बोलताना काही आमदारांनी जय महाराष्ट्र देखील म्हटलंय. याचा अर्थ हा शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र तर नव्हता ना, अशाही प्रश्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार ‘टीव्ही9 मराठी’सोबत बोलताना सांगितलं की शिवसेना आणि भाजपचे मागच्या तीस वर्षांपासून संबंध आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात मदत केली जाते. मात्र, सध्या तरी शिवसेना आणि भाजप युतीचा काहीही संबंध नाही, असं मुनगंटीवार म्हणालेतय.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आपल्या बंडावर कायम आहेत. त्यामुळे आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बळ देणारी विधाने भाजपमधून केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा युतीचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करू, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. पाटील हे शिंदे यांच्या बंडाला बळ देत असल्याचं या विधानातून ध्वनीत होत आहे. तसेच शिंदे यांना युतीचा प्रस्ताव पाठवा असं तर पाटील यांना शिंदे यांना सूचवायचं नाही ना? असाही सवाल यावेळी केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे विधान केलं आहे.