‘मी काय भ्रष्टाचार केला? हिंमत असेल तेवढे कारनामे बाहेर काढा’, एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यावर संतापले

| Updated on: Nov 12, 2022 | 9:20 PM

"मी तुमचे जे कारणानामे काढले आहेत ते खरे ठरले आहेत. तुमचे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आहेत. आधी त्यांच्या चौकशी करून जनतेसमोर या", असं आव्हान खडसेंनी महाजनांना दिलं.

मी काय भ्रष्टाचार केला? हिंमत असेल तेवढे कारनामे बाहेर काढा, एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यावर संतापले
Follow us on

जळगाव : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली होती. खडसेंना जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकटं पाडण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतल्याची बातमी समोर आलीय. या गुप्त बैठकीच्या बातमी समोर आल्यानंतर एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर प्रचंड घणाघात केला.

“मी काय भ्रष्टाचार केला? तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा. मी तुमचे जे कारणानामे काढले आहेत ते खरे ठरले आहेत. तुमचे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आहेत. आधी त्यांच्या चौकशी करून जनतेसमोर या”, असं आव्हान खडसेंनी महाजनांना दिलं.

“ॲडव्होकेट बाळू पाटील यांनी जामनेर नगरपालिके अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी का थांबली? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. भ्रष्टाचार करायचा आणि वरून लोकांना शिकवायचं? हे बरोबर नाही”, अशी टीका खडसेंनी केली.

हे सुद्धा वाचा

“एक ग्रामपंचायतीची निवडणूक सोडून मी निवडणुकांमध्ये कधीही हरलो नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मी सहा वेळा निवडून आलोय. मला तिकीट दिलं नाही म्हणून निवडून येण्याचा विषय येत नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“तुमची आज सत्ता आहे. तुमचे दोन मंत्री आहेत. आमदार तुमचे आहेत. नाथाभाऊ एकटा लढतोय. एकटं लढणे हीच मोठी ताकद आहे. हाच मोठा विजय आहे. मला पाडण्यासाठी पेट्या, खोकेवाला सर्व गोतावळा एक झालाय”, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.

“सर्व बोके एकत्र झाले तरी मी निवडून येऊन दाखवेन. जनता माझ्या पाठीशी आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “यांचा हेतू चांगला नाही. यांचा हेतू त्या दूध संघाला ओरबडणे हा आहे”, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.

“गिरीश महाजन यांना मी निवडण्याची भीती होती म्हणून मला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ दिले नाही”, असा देखील दावा एकनाथ खडसेंनी केला.