जळगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. खडसे यांना सर्व पदे घरात हवी असतात, अशी टीका महाजन यांनी केली होती. त्यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. ही टीका करताना त्यांची जीभ घसरली. महाजन यांना मुलगा असता तर तोही राजकारणात आला असता, असं वादग्रस्त विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकेच्या अध्यक्ष पदावर कायम का आहेत? साधना महाजन तुमच्या कुटुंबातल्या की बाहेरच्या आहेत? दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही, नाहीतर कदाचित मुलगा राजकारणात आला असता, असं वादग्रस्त विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या गेली 25 वर्षे राजकारणात आहेत. ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्या ते नगराध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे. मग गिरीश महाजन यांनी पत्नी ऐवजी दुसऱ्याला संधी का दिली नाही? असा सवालही त्यांनी केला.
भाजपमध्ये घराणेशाही असलेल्यांची संख्या मोठी असून नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीमधून आले आहेत. त्यांना हा नियम लागू नाही का? त्यामुळे एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत याचा विचार गिरीश महाजन यांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र या आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा खडसे आणि महाजनांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
खडसे कुटुंबावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करताना गिरीश महाजन यांच्या बाजूला भाजपा खासदार हिना गावित होत्या. त्यांचे वडीलही मंत्री आहेत. त्यांची बहीण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीतूनच पुढे आले आहेत. फडणवीस यांचे वडील आमदार होते, असंही त्यांनी सांगितलं.