मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाने शिवसेनेची (shiv sena) कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नव्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे हे पक्षाचे नेते असणार आहेत. दीपक केसरकर हे प्रवक्ते असणार आहेत. मात्र, या कार्यकारिणीत कुणालाही अध्यक्ष करण्यात आलं नाही. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पदाला कोणताही धक्का लावण्यात आला नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरे हे फुटीर गटाचेही अध्यक्ष आहेत. शिंदे यांच्या या खेळीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच या मागे एकनाथ शिंदे यांची काय खेळी आहे, यावरही तर्कवितर्क लढवले जात आहे. तसेच शिंदे आज दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे हे राजकीय पक्षाच्या नोंदणीची माहिती घेण्यासाठी तर आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार नाहीत ना? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे हे भाजपच्या नेत्यांचीही भेट घेणार असल्याने त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची काल ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे 14 खासदार ऑनलाईन हजर होते. या बैठकीतच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करतानाच नवी कार्यकारिणी तयार करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली. दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख पदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. तसेच या पदावरून उद्धव ठाकरे यांना बरखास्तही करण्यात आलेलं नाही.
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या या नव्या कार्यकारिणीत शिवसेनेतून हकालपट्टी झालेले माजी मंत्री रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. उपनेतेपदी गुलाबराव पाटील, उदय सामंत, यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत आणि विजय नहाटा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गट दिवसे न् दिवस मजबूत होताना दिसत आहे. शिंदे यांच्यासोबत 50 आमदार आहेत. त्यातील 40 आमदार शिवसेनेतील असून इतर दहा आमदार हे अपक्ष आहेत. शिवाय 12 खासदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, मुंबई, औरंगाबाद, उल्हासनगर आणि पालघरमधील नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यही शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे शिंदे गट दिवसे न् दिवस मजबूत होत असून ठाकरेंची शिवसेना कमकुवत होताना दिसत आहे.