नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे कालपासून दिल्लीत आहेत. कालपासून ते भाजपच्या (bjp) वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरही ते चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी शिंदे यांना डिवचले आहे. कुणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचं सरकार आहे, तर ते चुकीचं आहे. शिवसेनेचं हायकमांड हे मुंबईत आहे. मातोश्रीवर. दिल्लीत नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाही. गेला नाही. त्यामुळे आपोआप सर्वांचे मुखवटे गळून पडत आहेत, असं साांगतानाच ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचे नाहीत. त्यांचं हायकमांड दिल्लीत आहेत. त्यामुळेच ते दिल्लीत गेले आहेत, असा चिमटा संजय राऊत यांनी लगावला. राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून राज्याच्या अपेक्षा आहेत. सीमाभागातून सतत बातम्या येत आहेत. मराठी लोकांवर परत अत्याचार सुरू आहे. आता राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचे नाहीत. त्यांचं हायकमांड दिल्लीत आहेत. ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. सीमाभागाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, तोपर्यंत तो भाग केंद्रशासित करावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडावी. तो निर्णय घेऊनच महाराष्ट्रात यावं. आता मला बेळगावचं शिष्टमंडळ भेटून गेलं. त्यांनी मला परिस्थिती सांगितली. ठाकरे सरकार गेल्यापासून अत्याचार सुरू झाला असल्याचं या लोकांचं म्हणणं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
त्यांना केंद्र सरकारने वचन दिलं आहे. मागाल ते मिळेल. त्याबदल्यात हे काय देणार आहेत केंद्राला? मुंबईचे तुकडे? महाराष्ट्राचे तीन तुकडे? मराठी माणसावरील अन्यायाला परवानगी, मुंबईतील उद्योग कंपन्या मुंबईच्या बाहेर न्यायला परवानगी? हे फार गंभीर चित्रं आहे. पूर्वीश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि आता भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांनी आता या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवं, असंही ते म्हणाले.
दिल्लीत शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बैठक असू शकेल. पण राष्ट्रपतीपदाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. द्रोपदी मूर्मू या आदिवासी समाजातील आहे. त्यामुळे देशातील सर्व आदिवासी खासदारांना वाटतं की त्या राष्ट्रपती होतील. मराठी राष्ट्रपती करण्याचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा आम्ही मोठा निर्णय घेतला होता. यावेळीही आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील, असं सांगतानाच खासदारांची वेगळी बैठक नाही. विचारांचं अदानप्रदान झालं असेल. अलिकडे मध्यरात्री विचारांचं अदानप्रदान होतं, अशी कोटीही त्यांनी केली.
शिवसैनिक जोडलेलेच आहेत. आमदार गेले असतील पण शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. पडझड हा शब्द मला मान्य नाही. शिवसेनेत अनेकदा फूट पडली. त्यानंतर आधीपेक्षा जोमाने आणि उसळून लोकं उभे राहिली. पक्ष उभा राहिला. राणे, भुजबळ, नाईक गेले. पण शिवसेना कायम आहे. आम्ही 40 आमदारांची दखल घेणार. त्यांनी आधी राजीनामा द्यावा मग आम्ही काय घ्यायचे ते घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
नाशिकचा चिराही ढळलेला नाही. तो बालेकिल्लाच आहे. तरीही उद्धव ठाकरे म्हणाले, जा आणि लोकांना भेटा. नाशिकमधून फक्त दोन आमदार गेले. त्याने काही फरक पडत नाही. आम्ही ठाणे, मुंबई आणि नाशिक जिंकू. लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.