पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच आता शिंदे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेची पुणे न्यायालयाने (Pune Court) दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शेतकी जमीन आणि बिगर शेतकी जमीन, निवासी इमारती, स्थावर आणि जंगम मालमत्ता, तसंच त्यांची शैक्षणिक अहर्ता यात मोठी तफावत होती. ही बाब आम्ही अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही बाब आणून दिली आणि आज न्यायालयाने सीआरपीसी 200 चे आदेश दिले असल्याची माहिती अभिषेक हरदास यांनी दिलीय.
एकनाथ शिंदे यांनी एका रिक्षाचालकापासून सुरु केलेला प्रवास आता मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचलाय. 2019 च्या विधानसभा निवढणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 11 कोटी 56 लाखापेक्षा अधिकची संपत्ती आहे. त्यातील 9.45 कोटी स्थावर तर 2.10 कोटीची जंगम मालमत्ता आहे. एकनाथ शिंदे यांनी आपला व्यवसाय हा बांधकामाचा असल्याचं म्हटलंय. त्यांच्याकडे एकूण 7 गाड्या आहेत आणि त्याची किंमत 46 लाख रुपये आहे.
एकनाथ शिंदे यांच्या एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. हे जमीनमूल्य 2019च्या बाजारभावाप्रमाणे लावण्यात आलं आहे. त्यात सातत्यानं वाढ होत असते. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या 12 एकर जमीन आहे. तर चिखलगाव, ठाण्यात पत्नीच्या नावे 1.26 हेक्टर जमीन असल्याचीही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली होती.
वागळे इस्टेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावे 30 लाखांचा एक दुकानाचा गाळा आहे. तर ठाणे पश्चिमेच्या वागळे इस्टेटमधील धोत्रे चाळीत एक घर आहे. हे घर 360 स्केअर फिट आहे. तर लँडमार्क को ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. या फ्लॅटचं क्षेत्रफळ 2370 स्केअर फिट आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावेही असाच एक फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहे. तर शिवशक्ती भवन इथेही एक फ्लॅट पत्नीच्या नावे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली होती. घरं आणि गाळ्याांचा आताच्या घडीचं मूल्य पाहिलं तर ते 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.
2019 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्यावर 3 कोटी 74 लाख रुपयांचं कर्ज होतं. यात TJSB चं दोन कोटी 61 लाखांचं गृहकर्ज असणार आहे. यात श्रीमान रिएलिटीच्या 98 लाखांच्या कर्जाचाही समावेश आहे.